कोळा परिसरातील शेतकऱ्यांची तहान भागवून टेंभूचे पाणी तात्काळ माण नदीत सोडावे :  मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांची अधिकाऱ्यांना सूचना

टेंभू योजनेच्या पाण्यातून कोळा व परिसरात असलेल्या गावातील जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली यावे आणि टेंभूचे पाणी माण नदीत सोडावे यासाठी सोमवार दि 25 रोजी राष्ट्रवादी भवन सांगोला येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना हक्काच्या पाण्यापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवू नका तसेच टेंभूच्या पावसाळी आवर्तनात या परिसरातील जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली यावे यासाठी पाण्याचे व्यवस्थित नियोजन करा आणि या परिसरातील शेतकऱ्यांची तहान भागवून तात्काळ हे पाणी माण नदीत सोडावे अशा सूचना दिल्या आहेत.
या बैठकीस टेंभू योजनेचे उपविभागीय अभियंते श्री. गायकवाड यांसह शाखा अभियंता  श्री. पाटील, कालवा निरीक्षक संतोष पाटील व श्री. व्हनमाने उपस्थित होते. टेंभू योजनेतून जुनोनी येथील तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्यात आला आहे. टेंभूचे पाणी कोळा जुनोनी परिसरात दाखल झाल्याने परिसरातील शेतकरी आनंदीत झाला आहे. मात्र, टेंभूच्या पाण्यापासून या परिसरातील शेतकरी वंचित राहू नये आणि पावसाळी आवर्तनात जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली यावे म्हणून पावसाळी आवर्तनाचे नियोजन करण्यासाठी ही बैठक पार पडली. या बैठकीस कोळा, जुनोनी, जुजारपूर, हातीद, पाचेगाव खु., किडबीसरी, तिप्पेहळी परिसरातील प्रमुख राजकीय पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना देताना माजी आमदार दिपकआबा म्हणाले, चालू वर्षी संपूर्ण पावसाळा संपत आला तरीही, वरूनराजाने पाठ फिरवल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत बळीराजाला आधार देणे हे शासन आणि प्रशासन दोघांचे कर्तव्य आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्येकवेळी नियमावर बोट ठेवून काम न करता प्रत्यक्ष शेतकऱ्यांची गरज आणि मागणी ओळखून काम करणे अपेक्षित आहे. ऐन पावसाळ्यात आज भीषण पाणीटंचाईमुळे सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांपुढे  पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर मात करण्यासाठी टेंभूच्या अधिकाऱ्यांनी कोळा, जुनोनी, जुजारपूर, हातीद, पाचेगाव, कीडबिसरी, तिपेहळी या परिसरातील उर्वरित जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली कसे येईल याचे सविस्तर नियोजन करावे व परिसरातील शेतकऱ्यांशी सुसंवाद ठेवून त्यांच्या मागणीप्रमाणे पाणी सोडावे आणि येथील पाण्याची गरज पूर्ण झाली की हे पाणी पूर्ण क्षमतेने माण नदीत सोडून माण नदीवर असलेले सर्व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून द्यावेत अशी सूचनाही शेवटी मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिली.
१) आबाकडून टेंभूच्या अधिकाऱ्यांचे आभार..!!
टेंभू योजनेचे पाणी बुरंगेवाडी ते जुनोनी या भागात पूर्ण क्षमतेने सोडून टेंभूच्या अधिकाऱ्यांनी सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना सहकार्य केले आहे. याबद्दल कार्यकारी संचालक कपोले, अधीक्षक अभियंता पाटोळे, कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार उप विभागीय अभियंता श्री गायकवाड यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांचे मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button