मस्के कॉलनी सांगोला येथे डेंगूचा उच्छाद

सांगोला (प्रतिनिधी):-मस्के कॉलनी एखतपूर रोड सांगोला वसाहतीमध्ये सध्या डेंग्यूचे अनेक रुग्ण सापडत आहेत. मस्के कॉलनी येथे अनेक ठिकाणी पाण्याची डबकी साठलेले आहेत आणि ठिकाणी झुडपे व गवत उगवलेले आहेत व प्रचंड घाण आहे.त्यामुळे अनेक ठिकाणी डासाचा प्रसार झालेला आहे.
मस्के कॉलनी मधून नगरपालिकेला दरवर्षी करोडो रुपयांचा महसूल जातो परंतु अजून सुद्धा सर्व मस्के कॉलनीमध्ये एकही गटार नाही त्यामुळे अनेक ठिकाणी सांडपाणी व पाण्याचे साठे साठलेले आहेत. वारंवार तक्रारी करून सुद्धा नगरपालिका याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहे याचा त्रास येथील नागरिकांना सोसावा लागत आहे आणि ठिकाणी अजूनही फवारणी झालेली नाही स्वच्छता केलेली नाही त्यामुळे अनेक रुग्ण मस्के कॉलनी येथे सापडत असल्याचे नागरिक सांगत आहेत.
मस्के कॉलनीमध्ये बर्याच ठिकाणी कचरा व साचलेल्या पाण्यामुळे वाढती घाणीची समस्या व वातावरणातील बदल यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याचप्रमाणे अनेकांनी उघड्यावरच पाणी सोडले असल्यामुळे डासांच्या प्रादुर्भावामुळे डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आरोग्य विभागाने औषधांची फवारणी करण्याची मागणी नागरीकांकडून केली जात आहे.
मस्के कॉलनीबरोबरच शहरात बर्याच परिसरात डेंगू रोगांचा फैलाव सुरू झाला आहे. नगरपालिका प्रशासन नागरिकांना रस्ते, पाणी, आरोग्य या मूलभूत गरजा पुरवण्यात अपयशी ठरली असून आता आरोग्याशीही खेळले जात आहे. यासाठी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना न केल्यास रोगांनी संपूर्ण शहर वेढले जाणार आहे. याबाबत नागरीकही मूग गिळून गप्प असून कोणीही आवाज उठवायला तयार नाही.
तरी नगरपालिका व संबंधित अधिकार्यांनी याची ताबडतोब दखल घेऊन स्वच्छता साफसफाई करून घ्यावी, औषधाची फवारणी करावी अशी मागणी नागरिकाकडून होत आहे.