ओबीसींना टार्गेट केले तर निवडून येऊ देणार नाही- शंकरराव लिंगे

सोलापूर(प्रतिनिधी):-ओबीसी नेत्यांना टार्गेट करून अपमान केले जात आहे, आज पर्यंत ओबीसीचे 2 खासदार 30-40 आमदार निवडून येतात. ही संख्या नगण्य आहे. ओबीसींच्या मतावर ज्यांचे 20-25 खासदार 140 ते 150 आमदार निवडून येतात तरीसुद्धा ओबीसींना टार्गेट केले जाते. ओबीसी आरक्षण वाचवा अन्यथा खुर्ची खाली करा. जर ओबीसींना टार्गेट केले तर आमदार खासदार तर सोडा सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिका, महानगरपालिका यामध्ये एकसुद्धा उमेदवार निवडून येऊ देणार नसल्याचा इशारा राष्ट्रीय ओबीसी सत्यशोधक फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
ओबीसींची लोकसंख्या हि 65% पेक्षा जास्त आहे तरीसुद्धा ओबीसींना 27% आरक्षण दिले आहे प्रत्यक्षात 4 ते 6 % देखील मिळत नाही. त्यामध्ये प्रगत जातींची बेकायदेशीर घुसखोरी चालू आहे आणि या सर्व गोष्टीना सरकार जाणूनबुजून खतपाणी घालत आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरच्या अमृतमहोत्सवी काळातही ओबीसींना प्रगतीच्या व विकासाच्या प्रवाहापासून वंचित ठेवले जात आहे. जातनिहाय जण-गणना न झाल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण धोक्यात आले आहे व सध्या ते बंद आहे. कोणत्याच पक्षातील नेते ओबीसी आरक्षण वाचविताना दिसत नाहीये उलट ओबीसी नेत्यांचा वारंवार अपमान करून अन्याय करत आहेत.सर्व पक्षातील नेत्यांनी तोडगा काढून जातनिहाय जनगणना करावी अन्यथा खुर्ची खाली करा असा सज्जड दम राष्ट्रीय ओबीसी सत्यशोधक फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी भर पत्रकार परिषदेत दिला.
राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन चे अध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी ओबीसी जनजागृती अभियान 15 ऑक्टोबर पासून सुरु करण्यात येणार, ओबीसी राजकीय आघाडी स्थापन करून लोकसभेच्या 48 विधानसभेच्या 288 जागा लढविणार असल्याची माहिती ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्रात धनगर विरुद्ध आदिवासी मराठा विरुद्ध ओबीसी दलित विरुद्ध सवर्ण हिंदू विरुद्ध मुस्लिम पेटवून असा वाद पेटवून महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचे धोरण जातीवादी सरकार राबवत आहे यापासून महाराष्ट्रातल्या जनतेने सावध राहावे असेही लिंगे म्हणाले या पत्रकार परिषदेला समता परिषदेचे बापूसाहेब भंडारे, भारत माळी, धर्मराज स्वामी, अखिल भारतीय माळी महासंघाचे संजय इनामदार, ओबीसी एनटी पार्टी महिला अध्यक्ष डॉक्टर माधुरी पारपल्लीवार, मोतीराम राठोड इत्यादी मान्यवर उपस्थित होते