स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण व्हावे यासाठी माझी माती, माझा देश अभियान – चेतनसिंह केदार-सावंत

ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध लढण्याची हिंमत आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी दाखविली. अगणीत हुतात्म्यांच्या त्यागाने, बलिदानाने आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असतानाच आगामी काळात देशाची वाटचाल कशी असावी, भविष्याचा वेध घेताना या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांचे स्मरण व्हावे यासाठी माझी माती, माझा देश हे अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. प्रत्येक नागरिकाच्या मनात स्वदेश, स्वधर्म आणि स्वाभिमान जागवण्याचे काम या अभियानाच्या माध्यमातून होणार आहे. माझी माती, माझा देश अभियानाद्वारे स्वातंत्र्यसैनिकांचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोचवले जाणार आहे, असे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी व्यक्त केले.
केंद्रशासनाच्या आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या वतीने करमाळा तालुक्यात माझी माती, माझा देश हे अभियान राबविण्यात आले. यावेळी चेतनसिंह केदार सावंत बोलत होते.
यावेळी युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुदर्शन पाटसकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे,ज्येष्ठ नेते विठ्ठलराव भणगे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत पवार, करमाळा तालुका सरचिटणीस सुहास घोलप, अमर साळुंखे, करमाळा शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, युवा प्रदेश सचिव अजित कुलते, युवा मोर्चा प्रदेश सचिव दीपक चव्हाण, सोलापूर शहर अध्यक्ष गणेश साखरे, जय डोंगरे, नवनाथ भुजबळ, माजी शहराध्यक्ष संजय घोरपडे, रामभाऊ ढाणे, चंद्रकांत राखुंडे, सोशल मीडिया प्रमुख नितीन कांबळे, शहर उपाध्यक्ष कपिल मंडलिक, व्यापारी आघाडी शहर अध्यक्ष जितेश कटारिया, आदींसह भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत म्हणाले, क्रांतीकारकांनी केलेला त्याग आणि बलीदान यांमुळे आपण स्वातंत्र्याचे अमृतक्षण अनुभवत आहोत. माझी माती माझा देश अभियानातून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत हा ऐतिहासिक वारसा जोपासण्याचे काम आपण करत आहोत. स्वराज्याचा हुंकार महाराष्ट्राच्या मातीतून उमटला. प्रत्येकाने त्याचा अभिमान बाळगला पाहिजे. ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध लढण्याचे धारिष्ट्य क्रांतीकारकांनी दाखवले. स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांचे कुटुंबीय यांनी देशासाठी त्याग केला. ही देशभक्ती आणि विकासाची ज्योत तेवत राहील अन् ती पुढील पिढीपर्यंत पोचवण्याचे काम आपण सर्वांनी केले पाहिजे. भारताला विकसित देश बनवण्याचे स्वप्न साकार करायचे आहे. गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उखडून टाकायची आहे. देशाच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगायचा आहे. एकता आणि एकजूट यांसाठी कर्तव्यदक्ष रहायचे आहे. स्वराज्यासाठी क्रांतीकारकांच्या बलीदानाच्या प्रेरणेतून आता सुराज्यासाठी तरुणांनी संघटित व्हावे असे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी व्यक्त केले.