महिलांसाठी सजगता हीच सुरक्षितता – पोलीस उपनिरीक्षक रूपाली उबाळे ; सांगोला विद्यामंदिरमध्ये कायदा ज्ञान व महिला सुरक्षितता मार्गदर्शन

सांगोला (प्रतिनिधी):- समाजाची प्रतिष्ठा ही महिलांच्या सुरक्षिततेवर अवलंबून असते. ज्या समाजात मुली किंवा महिला सुरक्षित नाहीत, तेथील समाज आपली प्रगती करू शकत नाही. मुलीची सुरक्षा हा केवळ तिचा अथवा तिच्या कुटुंबाचा मामला नसून, ती संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. त्यामुळे आपल्यासमोर होणारा महिलेवरील, अन्याय व मुलींची छेडछाड प्रत्येकांनी तसेच स्वतः मुलींनीही सजगपणे पोलीसांना सांगितली तरच सुरक्षितता राहील.असे असे प्रतिपादन सांगोला पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक रूपाली उबाळे यांनी केले.सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे कायदेविषयक ज्ञान व महिला सुरक्षितता या विषयावर मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावर सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपप्राचार्य शहिदा सय्यद, पर्यवेक्षक बिभीषन माने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संस्थापक अध्यक्ष कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास प्रमुख पाहुणे पोलीस उपनिरीक्षक रुपाली उबाळे यांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला.
पुढे बोलताना पोलीस उपनिरीक्षक रूपाली उबाळे म्हणाल्या कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांनी १९५२ साली सांगोला तालुक्यात माध्यमिक शिक्षणाची सोय नव्हती ही गरज लक्षात घेऊन शाळा स्थापन केली त्यामुळेच तुम्ही शिक्षण आज शिक्षण घेत आहे असे सांगत त्यांच्या आचार- विचारांचे कौतुक केले.व विद्यार्थ्यांना पोक्सो कायदा म्हणजे काय,त्याची गरज,मिळणारी सुरक्षितता यासंदर्भात माहिती दिली. तसेच आपल्या मनगटातील ताकद व योग्य संस्कार आई-वडिलांकडून मिळतात. त्यांचा आदर करा.या वयात प्रेम नको विविध प्रयत्नाने आपली क्षमता सिद्ध करा असे सांगत विद्यार्थ्यांना खूप मौलिक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य गंगाधर घोंगडे यांनी अध्यक्षीय मनोगतात या कार्यक्रमाच्या आयोजनाची गरज स्पष्ट करत पोलीस उपनिरीक्षक रूपाली उबाळे यांच्या विचारांचा विद्यार्थ्यांनी अवलंब करा.असे सांगत ‘ मेरी मिट्टी मेरा देश’ यासंदर्भात माहिती दिली होती .या कार्यक्रमासाठी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक बिभीषण माने यांनी केले, सूत्रसंचालन प्रा.धनाजी चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.कु.अर्चना कटरे यांनी केले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक रूपाली उबाळे यांनी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज येथील बॉक्सिंग खेळाडूंची भेट घेतली. खेळाडूंसाठी मिळणारे प्रशिक्षण, विविध स्पर्धेत संपादन केलेले यश यासंदर्भात आनंद व्यक्त केला. व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या..