नीरा उजवा कालव्याचे हक्काचे पाणी पूर्ण क्षमतेने सांगोला तालुक्याला मिळावे ; मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील

नीरा उजवा कालव्यातून रब्बी हंगामासाठी सांगोला तालुक्याच्या हक्काचे पाणी मैल ९३ पासून पूर्ण क्षमतेने म्हणजेच ४०० क्युसेकने सांगोला तालुक्याला मिळाले पाहिजे. सांगोला तालुक्यात सध्या सरासरीच्या निम्मा पाऊस झाल्याने भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आणि जनावरांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. अशावेळी नीरा उजवा कालव्याचे पाणी रब्बी हंगामासाठी तात्काळ सांगोला तालुक्यासाठी सोडावे अशी आग्रही मागणी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केली.
शुक्रवार २० ऑक्टो रोजी नीरा उजवा कालव्याचे पाणी वाटपाच्या नियोजनाबाबत पुणे येथील सिंचन भवनमध्ये कालवा सल्लागार समितीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीस राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राज्याचे सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील, विधान परिषदेचे मा सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आम. दत्तामामा भरणे, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार रवींद्र धंगेकर, आमदार समाधान आवताडे, आमदार राम सातपुते, अभिजित पाटील, पुण्याचे जिल्हाधिकारी, नीरा उजवा काळाव्याचे कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, यांच्यासह कालवा सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते.
या बैठकीत माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सुरुवातीपासूनच सांगोला तालुक्याच्या पाणी प्रश्नावर आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी ते म्हणाले, पहिल्या दिवसापासून मैल ९३ येथून पूर्ण क्षमतेने पाणी मिळत नसल्याने सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांची तहान भागत नाही. पाण्याचे व्यवस्थित नियोजन होत नाही, त्यामुळे अनेक शेतकरी पाण्यापासून वंचित राहतात. यासाठी रब्बी हंगामासाठी असलेल्या आवर्तनात पहिल्या दिवसापासून सांगोला तालुक्याचे आवर्तन सुरू असेपर्यंत मैल ९३ येथून ४०० क्युसेकने सांगोला तालुक्यासाठी विसर्ग सुरू ठेवल्यास पाणी प्रश्न मार्गी लागेल. तसेच तिसंगी सोनके तलाव ५०% भरून द्यावा आणि त्याखाली असलेल्या शेतकऱ्यांना तलावातून पाणी न देता आवर्तन सुरू असताना डी ३ मधून दोन पाळ्यामध्ये पाणी द्यावे. सांगोला तालुक्यातील चिंचोली तलाव ऐन पावसाळ्यात कोरडा ठणठणीत पडला आहे. तो तात्काळ भरून द्यावा आणि याखालील गावांना यातून पाणी सोडावे अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केली.
१) आबा-बापूंची मागणी आणि दादांचे प्रशासनाला आदेश..!!
रब्बी हंगामासाठी नीरा उजवा कालव्यातून मैल ९३ येथून शेवटच्या दिवसापर्यंत सांगोला तालुक्यासाठी पूर्ण क्षमतेने (४०० क्यु) पाणी सोडावे अशी मागणी दिपकआबा साळुंखे पाटील आणि आमदार शहाजीबापू पाटील यांनी मागणी केली .यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तात्काळ निरा उजवा कालव्याचे कार्यकारी अभियंता आणि प्रशासनाला आबा-बापूंच्या मागणीनुसार पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत मैल ९३ पासून सांगोला तालुक्यासाठी पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्याचे आदेश दिले.