तिसंगी तलाव भरण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांची आग्रही मागणी

सांगोला – चालू वर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे उद्भवलेली दुष्काळ सदृश्य परिस्थिती व रब्बी हंगामाच्या दृष्टीने शेतीपिके व नागरिकांना पिण्यासाठी निरा उजवा कालवा मधून पाणी सोडून सांगोला विधानसभा मतदारसंघातील तिसंगी ( पंढरपुर ) तलावासह महिम , चिंचोली व हलदहिवडी तलाव पाण्याने पुर्ण क्षमतेने भरुन द्यावेत तसेच सांगोला शाखा फाटा क्रमांक – ५ ला पाणी सोडून लाभ क्षेत्रातील आवर्तन पूर्ण करण्याची आग्रही मागणी आ.शहाजीबापू पाटील यांनी पुणे येथील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत लावून धरली.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आ.पाटील यांच्या मागणी प्रमाणे तातडीने निर्णय घेवून येत्या १० नोव्हेंबर पासून निरा उजवा कालवा अंतर्गत डी -३ पळशी मार्गे पाणी सोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
रब्बी हंगाम २०२३-०२४ च्या सिंचनाच्या नियोजनासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री ना अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल शुक्रवारी पुणे येथील सिंचन भवनला कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीस अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप , कार्यकारी संचालक कपोले, मुख्य अभियंता हणमंत गुणाले , कार्यकारी अभियंता श्री डुबल विधान परिषद सदस्य आमदार रामराजे निंबाळकर, आ.दत्तात्रय भरणे, आ. शहाजी बापू पाटील, आ.समाधान अवताडे, आ. राम सातपुते, आ. रवींद्र दंगेकर, माजी आमदार दीपक साळुंखे , अभिजीत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीच्या सुरुवातीलाच आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगोला तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्याची वस्तूनिष्ठ परिस्थिती मांडून तिसंगी तलावात पाणी सोडावे या मागणीसाठी तरुण शेतकरी गेल्या अनेक दिवसापासून तलावाच्या ठिकाणी धरणे आंदोलनास बसले आहेत ही गंभीर बाब समितीच्या निदर्शनास आणून देत तिसंगी तलावात पाणी सोडून भरून देण्याची आग्रही मागणी केली, फाटा क्रं-९५/३ मधून महिम तलाव , निरा उजवा कालवा मैल ९३ खाली कालव्यातून पाणी सोडून चिंचोली तलाव , हलदहिवडी तलाव तसेच सांगोला शाखा फाटा क्रमांक -५ ला पाणी सोडून लाभ क्षेत्रातील आवर्त पूर्ण करून द्यावे अशी मागणी केली होती .
यावेळी आ. पाटील यांच्या मागणीवर बैठकीत बैठकीत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंपदा विभाग व पाटबंधारे अधिकारी यांचे कडून माहिती घेऊन चर्चा केली व पंढरपुर( तिसंगी )तलाव , सांगोला तालुक्यातील महिम, चिंचोली व हलदहिवडी तलावात पाणी सोडण्याबरोबर सांगोला शाखा फाटा क्रमांक -५ ला पाणी सोडण्याची तात्काळ कार्यवाही करावी असे सुचना देण्यात आल्या.