अवकाळीने नुकसान झालेल्या बागांचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी- डॉ.बाबासाहेब देशमुख
सोनंद आणि डोंगरगाव येथे अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे नुकसान

सांगोला(प्रतिनिधी):- अवकाळी पावसामुळे थैमान घातल्याने शेतकर्यांचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकर्यांना मोठा फटका बसल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून घेतला गेला.त्यामुळे शेतकरी बांधवांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. अवकाळीने नुकसान झालेल्या सांगोला तालुक्यातील बागांचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेकाप नेते डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे.
सांगोला तालुक्यातील सोनंद, डोंगरगाव व परिसरातील द्राक्ष बागांना वादळी वार्यासह अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. बाजारपेठेत जाण्यासाठी तयार मालांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.
सांगोला तालुक्यातील सोनंद येथील विजय हनुमंत बाबर, रवींद्र महादेव तेली, मुकेश जगन्नाथ काशीद, समाधान पाटील, बाळासो ढगे व डोंगरगाव येथील मोहन मराठे या शेतकर्यांनी द्राक्ष बागेची लागवड केली होती. त्याचप्रमाणे या बागा अतिशय काळजीपूर्वक जोपासल्या होत्या. या बागेची जोपासना करण्यासाठी विविध प्रकारची फवारणी आणि औषधे मिळून लाखो रुपयांचा खर्च केला होता.
बुधवारी अवकाळी पावसाने सांगोला तालुक्यात हजेरी लावली होती. त्यामुळे अनेक परिसरात द्राक्षांच्या बागा कोसळल्या असून बागेतील तयार द्राक्षांचे घड जमिनीवर पडले. त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता झालेला खर्च कसा भरुन काढायचा याची चिंता तालुक्यातील शेतकर्यांना लागली आहे.