सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

महूद-सांगोला रस्त्याच्या कामाचा आज भूमिपूजन सोहळा

गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा महूद-सांगोला रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एन.एच.९६५ जी या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते आज मंगळवार (ता.१४) रोजी करण्यात येणार आहे. दुहेरी वाहतुकीसाठी सुमारे दहा मीटर रुंदीच्या या रस्त्याचे काँक्रिटीकरण होणार आहे.लवकरच या रस्त्याचे काम सुरू होणार असल्याने मार्गावरील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
महूद-सांगोला रस्ता अनेक ठिकाणी उखडल्यामुळे या मार्गावर वाहन चालकांना कसरत करत वाहने चालवावी लागत होती.या मार्गावर सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात सतत होत होते.या रस्त्याचे काम लवकर व्हावे ही मागणी या मार्गावरील सर्व ग्रामस्थांमधून सातत्याने होत होती. आमदार शहाजी पाटील यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्याने या रस्ता बांधकामासाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे.केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयामार्फत हे काम होत आहे.सन २०२२-२३ च्या वार्षिक योजनेमध्ये या कामाचा समावेश करण्यात आला असून यास १६ फेब्रुवारी २०२३ ला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे.रस्त्याची एकूण लांबी २४.०६० की.मी.आहे. या रस्त्याच्या कामासाठी बांधकाम क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी निविदा दाखल केल्या होत्या. त्यातून पुणे येथील कृष्णाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.ली. या कंपनीस हे काम मिळाले आहे.या रस्त्याच्या कामासाठी एकंदरीत सबग्रेड ,जीएसबी, डीएलसी,पीक्यूसी असे एकंदरीत चार थर देण्यात येणार आहेत.त्यामुळे रस्त्याची उंची सुमारे एक मीटर पेक्षा अधिक असणार आहे.
या मार्गावर एकंदरीत तीन मोठे पूल आहेत.महूद-अकलूज मार्गावर दहा मीटर चे सहा गाळे असणारा पूल, साडेदहा मीटर चे आठ गाळे असणारा वाकी-शिवणे गावाजवळील पूल तर बावीस मीटरचे तीन गाळे असणारा चिंचोली तलावाजवळ चा पूल असे तीन मोठे पूल उभारण्यात येणार आहेत. याबरोबरच महूद गावाजवळ निरा उजवा कालव्यावर साखर कारखान्याजवळ व शिवणे येथे असे तीन छोटे पूल बांधले जाणार आहेत.या मार्गावर महूद,वाकी,शिवणे,सांगोला हद्दीत एकूण २.१५५ की.मी. लांबीचे गटार बांधण्यात येणार आहे.
या रस्त्याच्या कामाचे कंत्राट घेतलेल्या कृष्णाई इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने ढाळेवाडी पाटी महूद नजीक सामुग्रीची जमवाजमव केलेली आहे.सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये या मार्गावरील चिंचोली तलावाजवळील,वाकी-शिवणे येथील मोठ्या तसेच छोट्या पुलांचे काम हाती घेण्यात येणार आहे.मंगळवार(ता.१४) रोजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे.अध्यक्षस्थानी आमदार शहाजी पाटील असतील.तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील,शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर,माजी नगराध्यक्ष पी.सी.झपके,बाबुराव गायकवाड,भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार,रफिक नदाफ,दादासाहेब लवटे,तानाजी पाटील,मधुकर बनसोडे,नवनाथ पवार,समीर पाटील,खंडू सातपुते आदी उपस्थित राहणार आहेत.
असा असेल महूद-सांगोला रस्ता राष्ट्रीय महामार्ग
*मार्ग क्रमांक – एन.एच.९६५ जी
*मार्गावरील गावे- महूद,वाकी,शिवणे, सांगोला
* रस्त्याची लांबी- २४.०६० कि.मी.
*दुहेरी वाहतुकीसाठी दहा मीटर रुंदीचा  काँक्रिटीकरण रस्ता
*प्रशासकीय व तांत्रिक मान्यता रक्कम – २५३.७८ कोटी
* कंत्राटाची रक्कम – ११३.५० कोटी
*कंत्राट दाराचे नाव- कृष्णाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.ली.पुणे
*तीन मोठे पूल-महूद,वाकी-शिवणे, चिंचोली तलाव
*तीन छोटे पूल – महूद,साखर कारखान्याजवळ,शिवणे
* बस निवारा शेड ९ – महूद येथे २, महूद हॉस्पिटल,साखर कारखाना,वाकी, शिवणे,चिंचोली फाटा,सांगोला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!