जपसंकुलाच्या माध्यमातून सुरु असलेले नामप्रसाराचे कार्य अनन्यसाधारण- मोहनबुवा रामदासी

सांगोला ( प्रतिनिधी )- जपसंकुलाच्या माध्यमातून सुरु असलेले नामप्रसाराचे कार्य अनन्यसाधारण असे आहे. आपला प्रपंच, आपला परमार्थ सगळं श्री गोंदवलेकर महाराज आहेत. ते कायम आपल्या पाठीशी असतात. त्यांच्यावर श्रद्धा ठेऊन कार्य करावे, असे प्रतिपादन समर्थभक्त श्री. मोहनबुवा रामदासी यांनी केले.
चैतन्य जप प्रकल्प २३ व्या राज्यस्तरीय शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी श्री. मोहन बुवा रामदासी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिबिराचे उद्घाटक श्री व सौ. हौसाबाई पिराजी धायगुडे, आमदार सुभाषबापू देशमुख, आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे- पाटील, माजी जि. प. अध्यक्ष जयमालाताई गायकवाड, पुरोगामी युवक संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख, सां. ता. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष प्रा. पी. सी. झपके, सूतगिरणीचे चेअरमन डॉ. प्रभाकर माळी, जप संकुलचे राज्य अध्यक्ष श्री. नंदकुमार जोशी, कार्याध्यक्ष धैर्यशीलभाऊ देशमुख, सांगोला शिबीर प्रमुख इंजि. मधुकर कांबळे आदीसह मान्यवर उपस्थित होते.


पुढे बोलताना रामदासी म्हणाले की, समर्थांच्या अवतारानंतर समर्थांचे समर्थ कार्य पुढे नेण्यासाठी श्रीरामरायांनी महाराजांची योजना केली. समर्थांचे उर्वरित कार्य महाराजांच्या हातून करायचं होतं. तेच नाम प्रसाराचे कार्य आजही सुरु आहे. चारशे वर्षांपूर्वी दिलेला महामंत्र महाराजांच्या रूपाने प्रफुल्लीत झालेला दिसतो. जागृत ठिकाणी गेल्यानंतर जो अनुभव येतो तोच अनुभव सांगोल्याच्या ध्यान मंदिरात आला. महाराज म्हणतात त्याप्रमाणे “जेथे नाम तेथे माझे प्राण” असल्याचे ध्यानमंदिरात जाणवले. महाराज ज्याच्या हाती माळ देतात त्याची सर्व जबाबदारी ते घेतात. तेव्हा त्यांच्यावर श्रद्धा ठेऊन प्रपंच व परमार्थ करावा असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी आमदार सुभाषबापू देशमुख, आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे- पाटील, डॉ. बाबासाहेब देशमुख, प्रा. पी. सी. झपके, नंदकुमार जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात कार्याध्यक्ष धैर्यशीलभाऊ देशमुख यांनी जप प्रकल्पाची माहिती उपस्थितांना दिली. सूत्रसंचालन ऍड. गजानन भाकरे यांनी तर आभार प्रदर्शन इंजि. मधुकर कांबळे यांनी केले.
शिबिराच्या निमित्ताने सकाळी संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले जपकार तसेच हत्ती, घोडा, सनई- चौघडा यासह भव्य दिव्य अशी शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील पुरुष व महिला साधक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रस्त्यावर ठिकठिकाणी या शोभायात्रेचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.