नामजपामुळे जीवनामध्ये आनंदादायी परिवर्तन होते- ह.भ.प. जयवंत महाराज बोधले
चैतन्य जप प्रकल्प राज्यस्तरीय शिबीराचा सांगोल्यात समारोप
सांगोला(प्रतिनिधी ):-चैतन्य जप प्रकल्पाच्या माध्यमातून चालणारा 25 तास नाम जप हा यज्ञ असून यामुळे अहंकाराची निवृत्ती होऊन जीवनामध्ये आनंदादायी परिवर्तन होते. असे प्रतिपादन ह.भ.प. जयवंत महाराज बोधले यांनी केले. चैतन्य जप प्रकल्प राज्यस्तरीय शिबीराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना बोधले महाराज म्हणाले की, ज्ञान, योग आणि कर्म यापेक्षाही नामस्मरण श्रेष्ठ आहे, म्हणून सर्वांनी नामस्मरण करणे गरजेचे आहे.श्री गोंदवलेकर महाराजांचे अनुष्ठान असलेल्या या पवित्र ठिकाणी मला बोलावले त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो व सर्वांसमोर नतमस्तक होतो. या सत्राचे प्रास्ताविक अॅड. गजानन भाकरे यांनी तर आभार प्रदर्शन इंजि. संतोष भोसले यांनी केले.
चैतन्य जप प्रकल्पाचे दोन दिवसीय 23 वे राज्यस्तरीय अधिवेशन सांगोला येथील रामकृष्ण व्हिला गार्डन येथे शनिवारी व रविवारी संपन्न झाले. दोन दिवसांच्या या शिबिरात काकडआरती, अखंड नामजप, सामुदायिक नामस्मरण, अध्यात्मिक सांस्कृतिक कार्यक्रम, जपकारांची मनोगते, सायंकाळी ह.भ.प.विलासबुवा गरवारे यांचे नारदिय कीर्तन, रात्री तिप्पेहळळी येथील ह.भ.प. संदीप मोहिते व ह.भ.प.व अण्णा महाराज यांची सांप्रदायिक भारूड जुगलबंदी झाली. तर दिवसभर वेदांत हॉस्पिटल सांगोला यांच्या सहकार्याने सर्वरोग निदान शिबिर घेण्यात आले, यात साधकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
रविवारी सकाळच्या सत्रात बोलक्यापरास मुकी बरी हा कार्यक्रम वृषाली कुलकर्णी व शुभदा थिटे यांनी सादर केला. सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबीर घेण्यात आले. त्यात 49 साधक, जपकारांनी रक्तदान केले. त्याचबरोबर ध्यानमंदिर परिसरात पाच वृक्ष लावून वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर ह.भ.प. धैर्यशीलभाऊ देशमुख यांचे निरूपण झाले. सायंकाळी 5 वाजता ह.भ.प. जयवंत महाराज बोधले यांच्या आशीर्वचनाने शिबिराची सांगता झाली.
या शिबिरात महाराष्ट्रातून आलेल्या जप प्रकल्पातील जप कारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी सांगोला येथील नामसाधना मंडळाचे साधक, साधिका व जप संकुलाचे सेवेकरी तसेच पुरुष- महिला सदस्यांनी परिश्रम घेतले.