जळीतग्रस्त शेगर कुटुंबाला आपुलकी प्रतिष्ठानकडून मदतीचा हात

सांगोला (प्रतिनिधी)- राहत्या पालाला आग लागून पालातील कपडे, धान्य व भांडी जळून नुकसान झालेल्या व संसार उघड्यावर आलेल्या सुभाष शेगर यांच्या कुटुंबाला आपुलकी प्रतिष्ठानने मदतीचा हात देऊन आपुलकी जोपासली.
वासूद रोड पाण्याच्या टाकीजवळ पालात एका नाथपंथी डवरी समाजातील कुटुंबाने संसार थाटला आहे. तीन लहान लहान मुलं व कर्ता पुरुष म्हणून वडील असं चौघांचं कुटुंब.मंगळवारी रात्री जेवण करून सर्वजण उघड्यावर पटांगणात झोपले आणि रात्री साडे दहाच्या सुमारास दिवा पडून पालातील वस्तूंनी पेट घेतला. पालातील सर्व भांडीकुंडी, धान्य, कपडे जळून बेचिराख झाले. नेमके याचवेळी आपुलकी सदस्य अरविंद केदार जात असताना त्यांना पालाला आग लागल्याचे दिसले. त्यांनी गाढ झोपलेल्या सर्वाना उठवले. आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. तोपर्यंत सर्व जळून खाक झाले होते. यासंदर्भात केदार यांनी माहिती दिल्यानंतर प्रतिष्ठानचे सदस्य सकाळी पाहणी करून आले आणि या शेगर कुटुंबाला संसारोपयोगी भांडी, सतरंजी, चटई, ब्लँकेटसह दोन महिने पुरेल एवढा किराणा माल आदी साहित्य उद्योगपती इंजि. विजयसिंह सुरवसे यांच्या व प्रा. संजय देशमुख सर यांच्या हस्ते देण्यात आले. यापूर्वी दिवाळीत 11 नोव्हेंबर रोजी याही कुटुंबाला दिवाळी फराळ व कपडे भेट देण्यात आले होते.
यावेळी आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, अरविंद केदार, महादेव दिवटे, रविंद्र कदम, अण्णासाहेब मदने गुरुजी, राम बाबर, रविंद्र कदम, अमर कुलकर्णी, संजय सरगर, सुरेशकाका चौगुले, दादा खडतरे, विलास म्हेत्रे, इंजि. विकास देशपांडे, बोराळकर सर, अरविंद डोंबे, प्रसन्न कदम, उत्तम पाटील, भटक्या विमुक्त संघटना तालुकाध्यक्ष शिवाजी इंगोले, शशिकांत दिवटे आदी उपस्थित होते.