श्री.अंबिकादेवी यात्रेसाठी नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता; उद्यापासून यात्रेस धुमधडाक्यात प्रारंभ
सांगोला(प्रतिनिधी):- श्री.अंबिकादेवी यात्रेसाठी नागरिकांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. उद्या रविवार दि.22 जानेवारी रोजी श्री.देवीची सवाद्य मिरवणूक काढून यात्रेस धुमधडाक्यात प्रारंभ होणार आहे. यावर्षी यात्रा पारंपारिक ठिकाणी न भरता मार्केट यार्ड परिसरात भरणार आहे. गेल्या दोन वर्षात कोरोना संसर्गामुळे यात्रेचे मोठ्या प्रमाणात आयोजन झाले नव्हते. यंदा मात्र मोठ्या उत्साहात यात्रा होईल. त्यामुळे प्रदर्शन समितीसह तालुका प्रशासन सज्ज झाले आहे.
कोरोनाचे सावट कमी झाल्याने आणि राज्य शासनाने निर्बंध कमी केल्याने यंदा श्री.अंबिकादेवी यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. बुधवार दि.18 जानेवारीपासून ते काल शुक्रवार दि.20 जानेवारी या कालावधीत संपूर्ण जागा वाटप करण्यात आले. यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली असून संपूर्ण मंदिर परिसरात रंगरंगोटी व मंदिर परिसराची दुरुस्ती करण्याचे युध्द पातळीवर सुरु आहे.यात्रा कालाधीत शेतीमालाचे प्रदर्शनासह विविध प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवार दि.28 जानेवारी हा यात्रेचा मुख्य दिवस असून 31 डिसेंबर रोजी यात्रेची सांगता होणार आहे.
कोरोनामुळे गेली दोन वर्षे यात्रा स्थगित करण्यात आली होती. त्याचप्रमाणे गर्दीवर बंधने असल्यामुळे सांगोला यात्रा झाली नाही. त्यामुळे या वर्षी होणार्या यात्रेसाठी नागरिकांसह बालचमूंमध्ये कमालीची उत्सुकता लागून राहिलेली आहे. यात्रा परिसरात लाईटची सोय करण्यात आली असून जमीनीचे सपाटीकरण करुन व्यापार्यांना जागा मोजून देण्यात आली. अनेक व्यापार्यांनी आपली दुकाने थाटण्यास सुरुवात केली आहे. यात्रा परिसरात गर्दी होवू नये म्हणून मनोरंजनाचे पाळण्यासाठी एका बाजूला जागा देण्यात आली आहे. पाठीमागील यात्रेमध्ये सांगोला-पंढरपूर रोडवर ज्या व्यापारी बांधवांची दुकाने होती त्या सर्व व्यापारी बांधवांना तशाच पध्दतीची जागा मार्केट यार्ड परिसरात देण्यात आली आहे.दोन्ही बाजूच्या मधोमध सुमारे 50 फुटाचा रस्ता सोडण्यात आला आहे. यात्रा परिसरात सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त लावण्यात येणार आहे.
मार्केट यार्ड परिसरात गेल्या 4 ते 5 दिवसापासून स्वच्छतेसह इतर पायाभूत सुविधा देण्यासाठी युध्दपातळीवर तयारी सुरु होती.यात्रा परिसरात शौचालये, स्वच्छतागृह, पिण्याची पाण्याची सोय करण्यात आली आहे. यात्रा यशस्वी पार पाडण्यासाठी कोर्ट रिसीव्हर अॅड.सारंग वांगीकर, अॅड.शिवनाथ भस्मे, अॅड.राजेंद्र चव्हाण, अॅड.संजीव शिंदे परिश्रम घेत आहे.