पाचेगांव खुर्द मध्ये उद्यापासून बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात
मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याच्या समर्थनार्थ समाज एकवटला

पाचेगांव/प्रशांत मिसाळ:
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याच्या समर्थनार्थ सकल मराठा समाज पाचेगांव खुर्द यांच्या वतीने शुक्रवार दि. 1 डिसेंबर पासून बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात करणार असल्याचे तहसीलदार कणसे यांना निवेदन देऊन कळविण्यात आले असल्याचे सकल मराठा समाज पाचेगांव खुर्द यांच्या वतीने सांगण्यात आले.
राज्यात सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी आंदोलने चालू आहेत. मनोज जरांगे पाटील यांना महाराष्ट्रातून मराठा समाज तसेच ओबीसी समाज बांधवांकडून मोठ्या संख्येने पाठिंबा मिळत आहे. त्यांच अनुषंगाने पाचेगांव खुर्द येथील सकल मराठा समाज यांच्या वतीने करण्यात येणाऱ्या साखळी उपोषणाला ओबीसी समाजाचा पाठिंबा असून गावगाड्यातील ओबीसी व मराठा समाज एकत्र गुण्यागोविंदाने नांदत असल्याचे चित्र दिसत आहे.
पाचेगांव खुर्द येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, हनुमान मंदिर येथे या साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली असून पाचेगांव खुर्द, नलवडेवाडी, मिसाळवाडी, गायकवाड मळा, जुना मळा, घुले मळा येथील सर्व गावकरी पाळीपाळीने या साखळी उपोषणात सहभागी होणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
तिसऱ्या टप्प्यातील उपोषणाच्या वेळी जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ पाचेगांव खुर्द येथील साखळी उपोषणाला मराठा समाजातील महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवण्यात आला होता तसाच याही वेळी महिलांचा सहभाग नोंदवला जाईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.