सरकारने नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे- डॉ.अनिकेत देशमुख

सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला तालुक्यात दोन दिवसांपासून अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकर्यांवर संकटाचे थैमान माजविले आहे. मागील दोन दिवसापासून झालेल्या अवकाळी पावसामुळे सांगोला तालुक्यातील शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने गेला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवाच्या पाठीशी ठामपणे सरकारने उभे राहावे अशी मागणी स्व.डॉ.भाई गणपतराव देशमुख यांचे नातू, शेकाप नेते डॉ.अनिकेत देशमुख यांनी केली आहे.
आधीच दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे सांगोला तालुक्यातील शेतकरी पिके जगविण्यासाठी संघर्ष करीत होते. मात्र गेले दोन दिवस सलग झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकर्याचे जनजीवन विस्कळीत झाले असून फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पाऊसामुळे द्राक्षे, क्रांदा, डाळिंब, ज्वारी, हरभरा, गहु आदी फळबागा, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अगोदरच दुष्काळामुळे शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहे. पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेला असून शेतकर्यांची सारी मदार रब्बी पिकांवरच अवलंबून आहे. पाऊस नसताना शेतकर्यांनी मेहनत करून जगवलेल्या पिकांची या अवकाळी पावसाने मोठी हानी झाली आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा मोठ्या संकटात सापडला आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकर्यांच्या पिकांना फटका बसल्याने शेतकर्यांच्या तोंडाशी आलेला घास आता हिरावला जात असल्यामुळे शेतकर्यांच्या अशा परिस्थितीमध्ये शासनाने तातडीने शेतकर्यांना मदत करावी. अनेक ठिकाणी शेतीतील उभी पिके जमीनदोस्त झाली असून द्राक्षे, क्रांदा, डाळिंब, ज्वारी, हरभरा, गहू आदी फळबागा, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचानामे करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना आर्थिक मदत लवकरात लवकर जाहीर करावी, अशी मागणी डॉ.अनिकेत देशमुख यांनी केली.