सांगोला (प्रतिनिधी):- आपण आपल्या जगण्यात एखाद्या ध्येयाच्या पूर्ततेसाठीच स्वप्न पेरत असतो या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी सातत्याने संघर्ष करावा लागतो खडतर परिस्थितीवर मात करत आपण ध्येयाला ध्येयाला गवसणी घालतो.आपण केलेल्या संघर्षातूनच गुणवत्तेचा अविष्कार सिद्ध होतो असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी व वक्ते सुनील जवंजाळ यांनी केले.
खारवटवाडी येथील सुकन्या कुमारी प्राची बापूसाहेब बाबर हिने CET परीक्षेत 98.02% गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल खारवटवाडी परिसरातील शिक्षणप्रेमी नागरिक व बाबर कुटुंबीयांच्यावतीने शिवशक्ती मल्टीपर्पज हॉल येथे आयोजित सत्कार समारंभात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ विधीज्ञ विशाल बेले, चौगुले क्लासेसचे संचालक प्रा. संजय चौगुले, पोपट केदार,विलास डोंगरे, यतीराज सुरवसे,दत्तात्रय बाबर. सुभेदार मेजर अमोल बाबर, ढोले पाटील सर, डॉ. दत्तात्रय इंगवले, उद्योगपती सतीश पाटील,रमेश सुरवसे. बाबासाहेब दिघे,सुरेश सुरवसे,महादेव बाबर, बापूसाहेब बाबर,पांडुरंग बाबर, शशिकांत बाबर,अमोल बाबर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना जवंजाळ म्हणाले की विद्यार्थ्याच्या गुणवत्तेमध्ये शाळेबरोबरच घरातील वातावरणाचाही खूप मोठा वाटा आहे.ज्या घरामध्ये शैक्षणिक वातावरण असते तिथे अतिशय उत्साहाने मुले अभ्यास करत असतात.विद्यार्थ्यांच्या ध्येयासाठी संपूर्ण परिवार व शाळा शिक्षक सातत्याने प्रयत्न करत असतात त्यातूनच अशा प्रकारचे यश समाजासमोर येते. केवळ शाळेतल्या शिकवणीवर नव्हे तर घरातल्या वातावरणावर ही आपल्या पाल्याचे शिक्षण अवलंबून असते. प्राची बाबर हिने अतिशय खडतर परिस्थितीवर मात करत मिळवलेले यश अनेकांसाठी आदर्श आहे. यावेळी जवंजाळ यांनी समाजातील यशस्वीतांची उदाहरणे देत विविध कविता सादर केल्या.
प्रमुख पाहुणे विधीज्ञ विशाल बेले यांनी समाजातील सद्यस्थिती कशा पद्धतीने आहे आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचा विकास कसा होईल यावर आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजनाने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवर व आई-वडिलांच्याहस्ते प्राची बाबर हिचा सत्कार करण्यात आला. तसेच सीईटी परीक्षेतील यशाबद्दल सानिका खाडे हिचा हि मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. संजय चौगुले, उद्योगपती सतीश पाटील, सुभेदार मेजर अमोल बाबर, विलास डोंगरे,दत्तात्रय बाबर बापूसाहेब बाबर,ढोले पाटील सर आदींनी आपल्या मनोगतातून प्राचीने मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुळमिरे मॅडम यांनी केले तर आभार दत्तात्रय बाबर यांनी मांडले.