मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याच्या समर्थनार्थ भव्य मराठा आरक्षण दिंडी

मराठा समाजाला आरक्षण मिळवा या प्रमुख मागणीसाठी मराठयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या 2 ते 3 महिन्यापासून आंतरवाली सराटी येथे उपोषण चालू आहे. त्यांच्या या लढ्याला पाठबळ देण्यासाठी पाचेगांव खुर्द ता. सांगोला येथे मनोज जरांगे पाटलांच्या पहिल्या टप्प्या पासून ते आता चौथ्या टप्प्या पर्यंत सलग साखळी उपोषण चालू आहे. यामध्ये तिसऱ्या टप्प्यात गावामध्ये भव्य अशा मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी गावातील लहान थोर मंडळी आणि महिला भगिनी यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.
यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार चौथ्या टप्प्यातील साखळी उपोषण हे पाचेगांव खुर्द मध्ये 1 डिसेंबर पासून चालू असून आरक्षण मिळेपर्यंत बेमुदत साखळी उपोषण करणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.
त्याच बरोबर मनोज जरांगे पाटील यांचा लढा बळकट करून मराठ्यांना आरक्षण मिळावे या मागणीसाठी गावाच्या पंढरीच्या पांडुरंगाला साकडं घालण्यात येणार आहे. या दिंडीचे नियोजन आज शुक्रवार दि 8 रोजी पासून करण्यात आले असून यामध्ये शेकडोंच्या संख्येने मराठा बांधवांनी सामील होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
शुक्रवार दि. 8 रोजी सकाळी 7 वाजता दिंडीचे उपोषण स्थळापासून प्रस्तान होईल, स. 8 वाजता मिरज पंढरपूर हायवेवरील हॉटेल चांदणीच्या मैदानात नाष्टा होईल, 8:30 वाजता दिंडी पुढे मार्गस्थ होईल, त्यानंतर दुपारचे जेवण 1 वाजता वाटंबरे माण नदीच्या पुलाच्या पुढं, काळ्या ओढ्याजवळ दिंडी आयोजकांच्या वतीने सर्वांसाठी जेवणाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सायं. 4 वाजता सांगोला तहसीलदार यांना लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण या मागणीसाठी निवेदन सादर करण्यात येईल. 5 वाजता सांगोला येथे चहापाणी कार्यक्रम होईल व आरक्षण दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल. पुढे बामनी, मांजरी मार्गे मेथवडे फाटा येथील अभिजित नलवडे बंधू यांच्या “साई गणेश मंगलकार्यालय” या मंगल कार्यालयात रात्रीच्या मुक्काम व जेवणाची सोय करण्यात आली आहे.
दुसऱ्या दिवशी शनिवार दि. 9 रोजी सकाळी 7 वाजता आरक्षण दिंडीचे पंढरपूर च्या दिशेने प्रस्थान होईल, सकाळी 8 वाजता संगेवाडी येथे सकाळचा नाष्टा त्यानंतर सकाळी 10 वाजता खर्डी येथील श्री सीताराम महाराज यांचे दर्शन घेऊन आरक्षण दिंडी पुढे मार्गस्थ होईल. दुपारचे जेवण 1 वाजता पंढरपूर रोडवरील फॉरेस्ट जवळील विसावा येथे करण्यात येणार आहे. त्यानंतर ठीक 4 वाजता आरक्षण दिंडी पंढरपूर येथे पोचून दक्षिणेची काशी असणाऱ्या श्री विठ्ठलाच्या चरणी मराठ्यांना लवकरात लवकर आरक्षण मिळावे म्हणू साकडं घालणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
दिंडी सोबत असणाऱ्यांना सर्वांना जेवण, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा याचे मोफत नियोजन आहे या आरक्षण दिंडी सांगोला तालुक्यातील सर्व गावातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.