सांगोल्यात दिवसाढवळ्या धूम स्टाईलने पळवली 5 लाख रुपयांची पिशवी

सांगोला(प्रतिनिधी):- बॅकेतुन काढलेले 5 लाख रुपयांची रोख रक्कम घराकडे घेवुन जात असताना फिल्मी स्टाईलने मोटार सायकलवरील दोन अनोळख्या इसमांनी 5 लाख रुपयांची प्लॅस्टीकची पिशवी जबरीने हिसकावून नेल्याची घटना सांगोला येथील तहसिल कार्यालयाजवळील भुमी अभिलेख कार्यालयाचे समोर दि,7 डिसेंबर रोजी दुपारी घडली.
भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे सांगोल्यात एकच खळबळ उडाली असून संतोष जाधव सांगोला यांनी सांगोला पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. सदरील पिशवी मध्ये 500 रुपये 600 नोटा असे 3 लाख रुपये व 200 रुपये 1000 नोटा असे 02 लाख रुपये असे एकुण 5 लाख रुपये होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवार दि.07 डिसेंबर रोजी दुपारी 1.15 वा. चे सुमारास फिर्यादी संतोष जाधव यांचे घराचे काम चालु असल्याने सांगोला येथील बॅकेतुन रोख 05 लाख रुपये काढले होते. त्यानंतर सदरचे पैसे एका प्लॅस्टीकचे पिशवीत गुंडाळुन मोटार सायकलवरुन ते घराकडे निघाले होते. त्यावेळी जाधव यांनी पैशाची प्लॅस्टीक बॅग ही मोटार सायकलचे टाकीवर ठेवली होती. घराकडे जात असताना तहसिल कार्यालयाचे जवळ भुमी अभिलेख कार्यालयाचे समोर रोडचे कॉर्नरवर आल्यावर रहदारी जास्त होती. वाहने थांबल्याने वाहतुकीमध्ये जाधव हे देखील थांबले होते. त्यावेळी समोरुन एका मोटार सायकलवरुन अनोळखी दोन इसम जाधव यांच्या मोटार सायकलजवळ आले. त्यावेळी मोटारसायकलवरील पाठीमागे बसलेल्या इसमानेे जाधव यांच्या मोटार सायकलच्या टाकीवर ठेवलेली 05 लाख रुपये रक्कमेची प्लॅस्टीकची पिशवी हातामधुन हिसका देवुन जबरीने चोरुन घेवुन वाढेगाव नाका, सांगोलेचे दिशेने पळुन गेले. त्यावेळी मोटार सायकल चालकाने त्याचे डोक्यात हेल्मेट घातलेले होते व पाठीमागे बसलेल्या इसमाने फुल बाहीचा पांढरे रंगाचा टि शर्ट व हाफ बरमोडा घातलेला होता. त्यानंतर त्यांचा पाठलाग केला असता ते चोर वाढेगाव नाका, सांगोला येथुन दिसेनासे झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.