विद्यार्थ्यांना वाणिज्य क्षेत्रात करिअरच्या विविध संधी-सीए स्वप्निल शेटे

वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी केवळ बँकेत नोकरी करावी किंवा चार्टर्ड अकौटंट व्हावे असा सर्वसामान्य समज झालेला आहे. परंतु अलिकडच्या काळात वाणिज्य शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पारंपरिक करिअर पेक्षा अन्य क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात व्यावसायिक संधी उपलब्ध झाल्या आहेत.नवीन संधीच्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याचा,ज्ञानाचा चांगल्या रितीने उपयोग करून करिअरच्या संधी प्राप्त करू शकतात,असे प्रतिपादन EPA कोल्हापूरचे संचालक सीए स्वप्निल शेटे यांनी केले. सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज मध्ये Elite Professional Academy, Kolhapur यांच्या वतीने वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ” वाणिज्य क्षेत्रातील करिअरच्या संधी ” या विषयावरील व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गंगाधर घोंगडे यांच्या हस्ते सीए स्वप्निल शेटे,सहायक सुशील संकपाळ यांचा ‘ सांगोल्याचे बापूजी ‘ ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.पुढे बोलताना सीए स्वप्निल शेटे म्हणाले, CA,CS,CMA या Professional कोर्ससाठी विद्यार्थ्यांची मनापासून तयारी व परिश्रमाची जोड दिल्यास या क्षेत्रात संधी मिळू शकते.सध्या आय.टी.,हॉटेल मॅनेजमेंट,शेअर मार्केट,बांधकाम,वाहन उद्योग, बँकिंग,सोशल वर्क,विमा व्यवसाय,पर्यटन आणि प्रवास,ई-कॉमर्स इ.क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती होत असल्याने या क्षेत्रात वाणिज्य क्षेत्रातील तरूणांची गरज वाढली आहे.यावेळी त्यांनी CA,CS,CMA,ACCA,CFA इ. कोर्स विषयीची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.
सदर कार्यक्रमास प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गंगाधर घोंगडे,उपप्राचार्य सौ.शहिदा सय्यद,प्रा.शिवशंकर तटाळे,प्रा.नवनाथ बंडगर, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत वाणिज्य विभागप्रमुख प्रा.राजेंद्र कुंभार, सूत्रसंचालन प्रा.प्रसाद खडतरे यांनी केले तर प्रा.सौ.सुवर्णा लवटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.