स्व.रामदास सदाशिव भोसले गुरुजी प्रथम पुण्यस्मरण दिन धायटी येथे संपन्न

सांगोला(प्रतिनिधी):- श्रीराम क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ धायटी या संस्थेचे संस्थापक, सांगोला तालुका साने गुरुजी कथामालेचे माजी अध्यक्ष स्व.रा.स.भोसले गुरुजी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त धायटी येथे पुष्पवृष्टी कार्यक्रम शुक्रवार दिनांक 15/12/2023 रोजी संपन्न झाला. यावेळी नाशिक येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.राहुल डुंबरे महाराज (नाशिककर) यांचे सुश्राव्य असे कीर्तन संपन्न झाले. महाराजांनी अण्णांच्या जीवनातील अनेक पैलू आपल्या खास शैलीतून उलगडून दाखवले.
स्वर्गीय रामदास भोसले गुरुजी हे शिक्षक क्षेत्रातील क्रांतीदूत होते. त्यांनी 1993 साली धायटीमध्ये शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यामुळे गावातील अनेक मुला-मुलींची शिक्षणाची सोय झाली. संस्थेत शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी आज उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यांनी धायटी गावामध्ये वाचनालय सुरू करून गावातील नागरिकांना वर्तमानपत्रे , पुस्तके, कादंबर्या , ग्रंथ यांच्या वाचनाची आवड निर्माण केली. ’वाचाल तर वाचाल’ ही म्हण खर्या अर्थाने त्यांनी खरी करून दाखवली. त्यांच्या घरातील मुले-मुली उच्च शिक्षित आहेत. अशाप्रकारे जो स्वतःच्या उद्धारासाठी जगतो तो केवळ स्वार्थ साधतो पण जो समाजाच्या उद्धारासाठी जगतो तोच खर्या अर्थाने महान ठरतो. हेच अण्णांच्या बाबतीत पटवून देताना कोट्यावधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो , लक्षावधी हरीण शोधल्यावर कस्तुरी मृगाचा शोध लागतो , हजारो शिंपले उघडल्यावर एक मोती सापडतो , शेकडो माणसांमधून एखादा शूरवीर सापडतो , अनेक समाजसुधारकांमधून अण्णांसारखा एखादाचं देवदूत सापडतो असे सांगितले.
पुष्पवृष्टी कार्यक्रमाला अण्णांचे नातेवाईक, पाहुणे मंडळी, मित्र मंडळी, अण्णांच्या विचारावर , कार्यावर प्रेम करणारे त्यांचे हितचिंतक, संस्थेच्या तिन्ही शाखेतील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी वृंद, धायटी गावातील ग्रामस्थ, भजनी मंडळ आदि उपस्थित होते.