चोरटे पकडले रंगेहात ; सांगोला येथील घटना..

सांगोला (प्रतिनिधी) कडलास ता सांगोला येथील अभिनव पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे दुचाकीची चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना दोन चोरीच्या दुचाकीसह रंगेहाथ पकडून रात्र गस्तीवरील पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना बुधवार दिं.३१ ऑगस्ट रोजी कडलास ता. सांगोला येथे घडली आहे. याप्रकरणी दुचाकी चोरीचे मोठे रॅकेट उघडकीस येणार आहे दरम्यान दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे काम पोलिसांचे असताना पेट्रोल पंपावरील कामगार दत्तात्रय संजय पवार रा कडलास या युवकाने मोठ्या शिताफीने दुचाकी चोरट्याना पकडून कामगिरी केल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सांगोला शहर व तालुक्यात दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना मोठ्या संख्येने वाढू लागल्याने पोलीस यंत्रणा ही हतबल झाली आहे. एखाद्या नागरिकाने आपली दुचाकी तहसिल कार्यालय किंवा शासकीय कार्यालयासह शहरातील दुकानासमोर , भाजी मंडई समोर उभी करून आपलं काम संपवून परत माघारी येईपर्यंत दुचाकी जागेवर राहील की ? नाही याची शाश्वती राहिली नव्हती तसेच रात्री अपरात्री सांगोला शहर व उपनगरातील घरासमोरून महागड्या किमतीच्या दुचाकी हातोहात लांबविल्या जात असल्यामुळे नागरिक ही धास्तावले आहेत
दरम्यान दोन अल्पवयीन मुलांनी सांगोला स्टेशन रोड व कडलास ( पवारवाडी ) येथून चोरलेल्या दोन दुचाकी कडलास येथील विजय गव्हाणे यांच्या पेट्रोल पंपावर बुधवारी रात्री सव्वा दहा वाजता घेवून आले होते त्याठिकाणी दोन मुले दुचाकीतील पेट्रोल काढताना कर्मचारी दत्ता पवार याने पाहून त्यांच्याकडे नाव,गाव अधिक चौकशी केली असता त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या व त्यांच्याकडील दुचाकीचा नंबर ओळखून त्याने अरुण गायकवाड यांना फोन करून तुम्ही दुचाकी कोणाला दिली आहे का ? अशी विचारणा केली असता त्यांनी माझी दुचाकी सांगोल्यातून चोरीला गेल्याचे सांगितले.
तोपर्यंत त्या अल्पवयीन मुलांनी एक दुचाकी पंपावर ठेवून सांगोला रस्त्याने धूम ठोकली. दत्ता पवार यांनी इतरांच्या मदतीने त्याचा पाठलाग करून सांगोला रोडवरील एका पिकअप शेडमध्ये दोघांना पकडले मात्र त्यावेळी त्यांच्या समवेत आणखी असणा-या दोघांनी तेथून धूम ठोकली. त्यानंतर विजय गव्हाणे यांनी पंपावर ग्रामस्थांकडून मुलांना मारहाण न होवू देता त्यांच्याकडे विचारणा केली असता त्या मुलांनी बुधवारी दिवसभरात सांगोला शहर, कडलास व जत येथून तब्बल ६ ते ७ दुचाकी चोरल्याचे सांगितले व चोरीच्या दुचाकी पुढे घेरडी येथील हातेकर नामक व्यक्तीला दिल्यानंतर त्याचेकडून प्रत्येक दुचाकी मागे मुलांना ३ हजार रुपये मिळत असल्याचे सांगितले. सध्या पोलिसांच्या ताब्यात त्या दोन अल्पवयीन मुलांसह चोरीच्या दुचाकी घेणारा घेरडीतील हातेकर ताब्यात असून त्याच्याकडे चौकशी सुरू आहे.
—————————————————-
-
कडलास येथून पकडलेल्या दोन अल्पवयीन मुलांकडे चौकशी करून घेरडी ता.सांगोला येथून एकास ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून आत्तापर्यंत चोरीच्या ५ दुचाकी हस्तगत केल्या असून अजून बऱ्याच चोरीच्या दुचाकी मिळणार आहेत -भीमराव खणदाळे पोलीस निरीक्षक सांगोला