sangola
सेवानिवृत्त मंडल अधिकारी मारुती जरग यांचे निधन
नाझरा(वार्ताहर):- सांगोला तालुक्यातील चोपडी येथील सेवानिवृत्त मंडल अधिकारी मारुती जगन्नाथ जरग यांचे गुरुवारी रात्री उशीरा अल्पशा आजाराने निधन झाले.
एकतपुर येथून त्यांनी तलाठी या नोकरीची सुरुवात केली.कोळे, बलवडी,कडलास,उदनवाडी अशा विविध ठिकाणी सेवा करत माळशिरस तालुक्यातील काही गावांमध्ये त्यांनी सेवा केली. या सेवेतूनच ते मंडल अधिकारी या पदावरती पोहोचले होते.कामाची उत्तम हातोटी आणि मितभाषी या त्यांच्या स्वभावामुळे सांगोला तालुक्यातील अनेक गावांमध्ये ते परिचित होते.त्यांनी विविध ठिकाणी तलाठी म्हणून काम करत असताना शासनाच्या विविध प्रकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या. गावातील ग्रामपंचायतीचा कारभार काही वर्ष त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळत विविध प्रकारची विकास कामे केली. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,दोन मुली,नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने चोपडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शुक्रवारी सकाळी दहा वाजता शोकाकुल वातावरणात चोपडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी विविध क्षेत्रातील लोक उपस्थित होते. त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी रविवार दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी सकाळी आठ वाजता चोपडी येथील स्मशानभूमीत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजते.