माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान,सांगोला व रोटरी क्लब ऑफ सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने बचतगट महिला मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

शनिवार दि. 23 डिसेंबर 2023 रोजी माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान व रोटरी क्लब ऑफ सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी 11 वाजता माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानच्या बचतगटातील महिलांचा वार्षिक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. संस्थेच्या मेळाव्याचे हे 26 वे वर्ष आहे.
मेळाव्याची सुरुवात दिप प्रज्वलन करून झाली. यानंतर गीत गायन आणि पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या खजिनदार डॉ.शालिनी कुलकर्णी यांनी केले. यानंतर बचतगट विभागाचा वार्षिक अहवाल नीता लाटणे यांनी तर मातृप्रबोधन वर्गाच्या वार्षिक अहवालाचे अर्चना कांबळे यांनी वाचन केले. यानंतर संस्थेतर्फे कै. डॉ. तारा गोडबोले यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा ‘श्रमलक्ष्मी’ पुरस्कार संस्थेच्या बचतगटातील सभासद सौ. उषा दहीवडकर यांना तर रोटरी क्लब ऑफ सांगोला तर्फे देण्यात येणारा ‘रणरागिणी’ पुरस्कार बचतगटातील सभासद श्रीमती ज्योती कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. तसेच कै. स्नेहा देशपांडे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ देण्यात येणारा ‘जिद्द’ पुरस्कार सोनंद येथील बचतगट प्रमुख सौ..सविता कोळसे – पाटील यांना देण्यात आला. पाहुण्यांची आणि रोटरी क्लब ऑफ सांगोलाचे अध्यक्ष रो. साजिकराव पाटील यांची ओळख नीता लाटणे यांनी केली.
प्रमुख मार्गदर्शक सौ चंद्रीका चौहान यांनी ‘उद्योजकता’ याबाबत महिलांना मार्गदर्शन केले. शेतकरी कुटुंबातील महिलांनी शेतीपूरक व्यवसाय कसा करावा आणि स्वतःबरोबरच कुटुंबाचा विकास कसा करावा याबाबत माहिती सांगितली. महिलांनी एकत्र व्यवसाय करून एकमेकींना मदत करावी असे सांगितले. दि. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी सांगोल्यातील महिलांना येण्यासाठी महिलांना आवाहन केले.
नंतर रोटरी क्लब ऑफ सांगोलाचे अध्यक्ष रो. साजिकराव पाटील यांनी ‘आपल्या मुलांवर चांगले संस्कार करायचे असतील तर महिलांनी अगोदर टीव्ही वरील मालिका पाहणे बंद करायला हवे. टीव्ही बघून आपली नवीन पिढी त्याचे अनुकरण करायला लागलेले आहे. आपली पिढी संस्कार करायला हवी, मुलांवर चांगले संस्कार व्हायला हवेत यासाठी त्यांनी चांगले बघायला व ऐकायला हवी आणि याची सुरुवात घरापासूनच करायला हवी. महिला सर्व काही करू शकतात महिला सांभाळू शकतात. महिलाच घर सांभाळत असते फक्त पुरुष कमावतो. म्हणून तो कुटुंबप्रमुख असतो. पण खरा संसार महिला सांभाळत असते.’ या शब्दात महिलांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहित केले.
रो. माणिकराव भोसले यांनी ‘ काल शेतकरी दिवस होता आणि आपल्या देशात महिलाच उत्तम शेती करतात आणि घरही उत्तम प्रकारे सांभाळतात असे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. मोना रत्नपारखी यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या तसेच यापुढेही सहकार्य करू असे सांगितले.या नंतर बचतगटात घेण्यात आलेल्या स्पर्धांचे तसेच मातृप्रबोधन वर्गातील स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. त्याच बरोबर बचतगटातील पु. अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त महिलांचा सत्कार करण्यात आला. जे.एच. कलेक्शन आणि रत्नपारखी ज्वेलर्स यांचे या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य लाभले. रत्नपारखी ज्वेलर्स कडून महिलांना कुपन देण्यात आले होते, त्याच्या लकी ड्रॉ मधून पाच महिलांना बक्षीस वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अश्विनी कुलकर्णी व आभारप्रदर्शन सौ.मंगल कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमात महिलांना रोटरी तर्फे अल्पोपहार आणि चहा देऊन संस्थेच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला संस्था अध्यक्षा डॉ. संजीवनी केळकर, खजिनदार डॉ. शालिनी कुलकर्णी ,विश्वस्त डॉ. केतकी देशपांडे, सौ शालिनी पाटील व श्रीमती श्रीदेवी बिराजदार तसेच रोटरी अध्यक्ष व इतर सभासद तसेच माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान चा सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. या मेळाव्यास 500 पेक्षा जास्त महिला उपस्थित होत्या.
2 Attachments • Scanned by Gmail