महाराष्ट्रसांगोला तालुका

आठवणीतील अण्णा … स्वर्गीय वसंतराव पाटील . . .

बरोबर २५ वर्षांपूर्वी नाझरे गावचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला … सूर्या सारख्या तेजस्वी अण्णांनी केलेल कार्य पाहिले तर आज सुद्धा अण्णा आपल्या आसपास वावरत आहेत याचा भास झाल्याशिवाय राहत नाही …. राजकारण असो . . समाजकारण असो . . अण्णांनी ज्या तळमळीने आयुष्यभर दिन दलित .. रंजलेल्या गांजलेल्या गोरगरिब लोकांविषयी नेहमी आपल्या उराशी कणव बाळगून या लोकांच्या जीवनात आनंदाचे .. सुखाचे .. दोन दिवस आले पाहिजेत हा एकच हेतू मनी बाळगून स्वर्गीय आबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केले व हे कार्य चिरंतन राहण्यासाठी जीवाचे रान केले . . . याचं उत्तम उदाहरण म्हणजे शेतकरी सहकारी सूत गिरणी ( डॉ. गणपतराव देशमुख सहकारी सूत गिरणी सांगोला . ) . . . निवडणूक असो … एखादा मोर्चा असो . . . पक्षाचे एखादे आंदोलन असो या सर्वांचे अगदी सुयोग्य नियोजन अण्णां करत असत . . . अण्णांनी एखादी गोष्ट . एखादे काम हाती घेतले आणि ते यशस्वी झाले नाही असे कधीच घडले नाही . . . म्हणून तर आबासाहेब मुंबईला जाताना तालुक्याची संपूर्ण जबाबादारी अंत्यत विश्वासाने अण्णांच्या वरती सोपवून जात असत . . . म्हणूनच अण्णांच्या शोकसभेत आबासाहेबांनी,” वसंतरावांच्या जाण्याने माझा एक हात गळून पडला … त्यांच्या जाण्याने तालूक्याचे नुकसान तर झालेच .. पण व्यक्तिशा माझं खूप नुकसान झाले आहे .” असे उद्गार काढले . आबासाहेब … खरं तर उंच पहाडासारखे त्यांचे व्यक्तिमत्व .. पण अण्णांच्या जाण्याने त्यांना झालेलं दुःख आणि त्यामुळे त्यांच्या डोळ्यात आलेले अश्रू ते लपवू शकले नाहीत . . हे साऱ्या तालूक्याने त्या ( दि.२८/१२/१९९८) दिवशी पाहिले .

“ध्येय , आशा प्रेम यांची होतसे का कधी पूर्ती ..
वेड्यापरि पुजितो आम्ही या भंगणाऱ्या मूर्ती ”
काव्याच्या या ओळी खोट्या ठरविण्यासाठीच ज्यांचा जन्म झालेला असतो. ..आपले ध्येय गाठण्यासाठी .. त्याच्यासाठी पडेल ते कष्ट करण्याची येणाऱ्या अडचणीवर खंबीरपणे मात करण्याची आणि ध्येयासाठी काहीही करण्याची जबरदस्त इच्छाशक्ती असलेल्या माणसाला यश कसे हुलकावणी देईल? अशी माणसं यशाच्या मागे न लागता यशच त्यांच्या मागे लागते.याचा प्रत्यय आपणास कै.अण्णांच्या आयुष्यातील घटनांकडे पाहिल्यावर येतो.

स्वर्गीय तुकाराम काकांच्या गुणग्राहक ,चाणाक्ष नजरेनं कै.अण्णांच्या व्यक्तिमत्त्वातील पैलूंना हेरलं आणि या हिऱ्यावर आणखी संस्कार करून त्याचे मोल वाढवण्यासाठी स्वर्गीय आमदार गणपतरावजी देशमुख साहेब यांच्याकडे सोपविले आणि आबासाहेबांनी अत्यंत , प्रेमाने , मायेने, विश्वासाने कै. अण्णांचे व्यक्तिमत्व घडविले . . अण्णांनी कृतज्ञता बाळगत आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आदरणीय आबासाहेबांच्या वर निष्ठा ठेवत त्यांचा एक विश्वासू सहकारी म्हणून स्वतःची ओळख निर्माण करून आपल्या सर्व आजी ,माजी सहकारी कार्यकर्त्यांच्या समोर एक सच्चा कार्यकर्ता म्हणून आदर्श ठेवला.

संत कवी निजानंद रंगनाथ स्वामी , पंडित कवी श्रीधर स्वामी व श्री संजीवा स्वामी महाराज यांच्या जन्माने व कार्याने पावन झालेल्या पवित्र भूमीत मान नदी काठावरील नाझरे या गावात 10 फेब्रुवारी 1940 रोजी जन्माला आलेल्या अण्णांनी आपल्या कर्तृत्वाने आपल्या गावाची व तालुक्याची एक वेगळी ओळख निर्माण केली . वकिलीची सनद मिळाल्यानंतर सांगोला शहरात अण्णांनी वकिली सुरू केली आणि त्याचवेळी आमदार गणपतरावजी देशमुख यांच्या कार्याने प्रभावित होऊन शेतकरी कामगार पक्षाच्या कार्याला सुरुवात केली . अण्णांनी 1972 ते 1996 पर्यंत सलग चोवीस वर्षे जिल्हा परिषद सदस्य व अभ्यासू विरोधी पक्षनेता म्हणून केलेल्या कामाची आठवण आजही लोकं सांगतात . त्याच दरम्यान १९७२ ते १९८० अशी सात वर्षे सांगोला तालूका पंचायत समितीचे सभापती म्हणून काम करताना अण्णांनी आपल्या कार्याचा ठसा जन माणसावर उमटविला.

आबासाहेबांनी अत्यंत विश्वासाने व अभ्यासू कार्यकर्ता म्हणून सोपविलेली कै . अण्णांच्या वरील जबाबदारी म्हणजे दिमाखात उभा केले असलेल्या शेतकरी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन पद . अण्णा 1978 ते 1998 असे सलग वीस वर्षे या गिरणीच्या चेअरमन पदी विराजमान होते.या काळात सूतगिरणीच्या माध्यमातून राबविलेले अनेक लोकोपयोगी उपक्रम त्या वेळेच्या आयोजनातील उत्कृष्टते मुळे आजही लोकांच्या स्मरणात आहे . दरम्यानच्या काळात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पंधरा वर्षे संचालक म्हणून काम पाहिले .कै .अण्णांनी ऑल इंडिया स्पिनिंग फेडरेशनचे अध्यक्ष पद भूषवले होते .सांगोला बार असोसिएशनचे अध्यक्ष , शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक संचालक ,माणगंगा साखर कारखान्याचे संचालक, सांगोला सहकारी साखर कारखान्यायाचे तज्ज्ञ संचालक ,अशा अनेक संस्थेत काम करताना राजकीय,औद्योगिक , शैक्षणिक क्षेत्रातील संस्थांशी त्यांचा अत्यंत निकटचा व जिव्हाळ्याचा संबंध आला होता. या प्रत्येक पदाला योग्य न्याय देण्यासाठी अण्णांनी खूप प्रामाणिक कष्ट घेतले होते . व आबासाहेबांचा विश्वास सार्थ ठरवला होता .

शैक्षणिक क्षेत्रात काम करताना ग्रामीण भागातल्या मुलांना खास करून मुलींना दर्जेदार शिक्षण आपल्या गावातच मिळावे यासाठी श्रीधर शिक्षण संस्थेची स्थापना केली व नाझरे ,राजुरी या ठिकाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरू केली. या संस्था अण्णांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार प्राचार्या मुल्ला मॅडम व त्यांचे सर्व सहकारी अतिशिय उत्तमरित्या चालवीत आहेत .

कै . अण्णांनी जि प विरोधी पक्षनेता म्हणून काम करीत असताना सत्ताधार्यांवर अंकुश ठेवून जिल्हा परिषदेच्या लोकोपयोगी योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला . ग्रामीण भागातील जनतेला केंद्रबिंदू मानून त्यांना त्यांच्या शेती व्यवसायाला पूरक ठरणाऱ्या योजना मिळाल्या तर गोरगरीब शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले जावू शकते ही भावना मनात ठेवून गांडूळ शेती, रेशीम प्रकल्प ,शेळीपालन, फळबाग लागवड शिबीर, शेती विषयक अभ्यास शिबीरे घेऊन अशा प्रकल्पांना चालना दिली .

आज सांगोल्या चे नाव डाळींबासाठी प्रसिद्ध आहे . त्याची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम स्वर्गीय अण्णांनी केले . . . तर या डाळींबाची शेती वाढली पाहिजे यासाठी रो ह योजनेत डाळींब शेती आणण्याचं महत्वपूर्ण कार्य स्वर्गीय आबासाहेबांनी केले आहे .म्हणूनच तालुक्यातील शेतकर्यांचे जीवनमान उंचावलेले आपणास दिसते आहे .

कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी अण्णा जवळपास ३० महिने एखाद्या झुंजार योद्ध्यासारखे लढले . आपल्या मृत्यूच्या अवघ्या ५० दिवस आधी सूतगिरणीवर सोलापुरच्या इंडियन कॅन्सर सोसायटीच्या सहकार्याने कर्करोग निदान व उपचार शिबीर भरवले होते . शेवटपर्यंत समाजाशी नाळ जोडलेल्या अण्णांनी सामाजिक बांधिलकी जपली . आपल्या कार्याने व कर्तृत्वाने लक्षात राहिलेले अण्णां आजच्या दिवशी म्हणजे २८डिसेंबर १९९८ रोजी प्रसिद्ध अनंतात विलीन झाले .

. . . कर्तृत्व .. जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर केलेले कार्य ,त्यांचे विचार सर्वांनाच प्रेरणादायी ठरतील हे निश्चित .
… अशा सामान्यातील असामान्य नेतृत्वाच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन …!!!🙏

सुनिल बनसोडे .नाझरे .
(मांजरी हायस्कूल, मांजरी . ता सांगोला )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!