विधानसभेच्या तोंडावर वातावरणनिर्मिती, भाजपच्या १९ नेत्यांची राज्यात यात्रा, महाविकास आघाडी विरोधात रान पेटवणार

नागपूर : विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी १९ नेत्यांच्या नेतृत्त्वातील संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यातील कानाकोपऱ्यात पोहोचणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.  २१ जुलै रोजी पुणे येथे महाराष्ट्रातील पाच हजार भाजपा पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन होणार असून त्यात भाजपाचे नेते केंद्रीय मंत्री अमित शाह, नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत संवाद यात्रेविषयी अंतिम रूपरेषा तसेच तारीख ठरणार आहे.

चंद्रशेखर बावनकुळे हे कोराडी (नागपूर) येथे वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. पुण्यात होणाऱ्या अधिवेशनात अमित शाह, नितीन गडकरी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यातील सर्व केंद्रीय राज्यमंत्री तसेच प्रदेशातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

संवाद यात्रा

महाराष्ट्रातील भाजपाचे १९ वरिष्ठ नेते संवाद यात्रेत सहभागी होतील. ही यात्रा सर्व ४८ लोकसभा, सर्व विधानसभा तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती गट आणि नगरपालिका क्षेत्रात पोहोचेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये घोषित केलेली कामे व महायुती सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या कामाची माहिती, सरकारने घेतलेले निर्णय जनसामान्यांपर्यंत पोहचविणार आहोत. समाजातील सर्व घटकांना केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. या संवाद यात्रेचा समारोप विधानसभानिहाय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

संघटनात्मक बैठक

२१ जुलैच्या पुणे अधिवेशनापूर्वी १९ तारखेला मुंबईत संघटनात्मक बैठक होणार असून महाराष्ट्र विधानसभा पक्ष प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव ही बैठक घेणार असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.

 

विरोधकांची भूमिका निंदनीय, मविआ चुकून सत्तेत आली तर लाभाच्या योजना बंद होतील

आरक्षण विषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर विरोधी पक्षांची बहिष्कार टाकण्याची भूमिका योग्य नव्हती. विरोधकांची भूमिका निंदनीय आहे. अशी भूमिका महाराष्ट्राच्या हिताची नाही. विरोधक जातीपातीचा राजकारण करत आहे हे जनतेला दिसले. चुकून महाराष्ट्रात मविआ सरकार आले तर लोकांच्या लाभाच्या योजना बंद होतील, अशी भीती व्यक्त करीत महाराष्ट्रातील जनतेला डबल इंजिन सरकार हवे आहे, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button