आपले सरकार सेवा केंद्र अथवा सेतू कार्यालयात अधिकचे पैसे मागितल्यास क्यूआर कोड वर तक्रार नोंदवण्याची सुविधा
अभिनव उपक्रम, केवळ क्युआर कोड स्कॅन केल्यास सेकंदात नोंदविली जाते तक्रार

जिल्ह्यातील नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना लागणारे विविध प्रकारचे दाखले उतारे व अन्य प्रमाणपत्रे ऑनलाईन पध्दतीने आपले सरकार सेवा केंद्र अथवा सेतू कार्यालयातून दिले जातात. परंतु बऱ्याचदा आपले सरकार केंद्र अथवा सेतू कार्यालयात विविध दाखले, उतारे व प्रमाणपत्रे काढण्यासाठी आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना मध्यस्थ व्यक्तीकडून शासनाने विहित केलेल्या रकमेपेक्षा अधिकच्या रक्कमेची मागणी करण्यात येत असल्याची वरिष्ठ अधिकारी वरिष्ठ यांच्याकडे तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत.
त्यामुळे सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सर्वसामान्य नागरिकांना मध्यस्थ व्यक्ती (एजंट) यांच्याकडून पैशाची मागणी होऊ नये अथवा झाल्यास तात्काळ तक्रार करता यावी यासाठी प्रत्येक आपले सरकार सेवा केंद्र अथवा सेतू कार्यालयात दर्शनी भागात क्यू आर (QR)कोड उपलब्ध करून देण्यात येत आहे, संबंधित नागरिकांनी हा किंवा कोड स्कॅन करून यावर तक्रार नोंदवण्याची सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, यावरील तक्रारीची तात्काळ दखल घेऊन त्यासंबंधी कारवाई करण्यात येणार आहे.
हा क्यु आर कोड सोलापूर जिल्ह्यातील सर्व सीएससी सेंटर तसेच सेतू कार्यालय, तहसील कार्यालय आणि प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयात लावण्यात आले आहेत. यामध्ये केंद्रचालकांनी दाखल्या साठी शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिकची रक्कम मागणी केल्यास, दाखला विहीत मुदतीत दिला नाही अथवा विलंब केला तर, दाखल्या संदर्भात संबधिताला एसएमएस व्दारे माहिती न दिल्यास, एजंटाव्दारे संबधित नागरिकांकडे अधिकचे पैसे मागणी केल्यास अशा कोणत्याहीप्रकारच्या तक्रारी असल्यास नागरिकांनी यावर दिलेला क्यु आर कोड स्कॅन केल्यास त्यावर तात्काळ आपली तक्रार नोंदविली जाते. तसेच आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तातडीने चौकशी करुन पुढील कार्यवाही केली जाते. त्यामुळे नागरिकांना कोणाला भेटण्याची अथवा अधिकचे पैसे देण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे नागरिकांनी जर असे प्रकार कोठे घडत असतील तर जिल्हा प्रशासनाने क्यू आर कोड स्कॅन करून तक्रार नोंदवणीच्या दिलेल्या अद्यावत सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे, आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.
*क्यू आर कोड वर आठ तक्रारी प्राप्त–
हा क्यु आर कोड कोणत्याही मोबाईल ॲपवरून स्कॅन करून नागरिकांना सुलभरित्या तक्रार नोंदविण्याकरिता उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आज दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोजीपर्यंत एकुण 8 तक्रारी क्यु आर कोड द्वारे नोंदविल्या गेलेल्या आहेत. या तक्रारीमधील 1 तक्रारीबाबत अर्जदार यांना कळविणेत आले आहे. उर्वरीत प्रकरणांबाबत चौकशी अहवाल प्राप्त करून तक्रारीत तथ्य आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.