सांगोला तालुकाराजकीय

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी  शेतकरी संघटना निश्चितपणे पुढाकार घेईल : रघुनाथदादा पाटील

शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन ; शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शेतकरी संघटना आक्रमक 

शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत राज्यकर्ते तोंडातून शब्द काढण्यासाठी तयार नाहीत. प्रशासन गांभीर्याने घेत नाही. शेतकरी विरोधी सरकार काम करत असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी  शेतकरी संघटना निश्चितपणे पुढाकार घेईल असे आश्वासन देत, ईव्हीएम मशीन हटवण्यासाठी आणि देश वाचवण्यासाठी सम विचार संघटनांना सोबत घेऊन जिल्हा आणि तालुका स्तरावर मोठ्या प्रमाणात जन आंदोलने आणि मोर्चे काढून सरकारला येत्या काळात चांगलेच धारेवर धरले जाईल असा इशारा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिला.
       सर्व शेतीमालावरील निर्यात बंदी ताबडतोब हटवावी किंवा प्रो. एम. एस. स्वामीनाथन शिफारसी ची अंमलबजावणी करावी,  ई व्ही एम मशीन हटाव देश बचाओ, दोन साखर कारखान्यातील हवाई अंतराचे अट्ट तात्काळ रद्द करावी, सरसकट शेतकऱ्यांची, कामगारांची, कर्जदारांची कर्जमुक्ती व वीज बिले मुक्त तात्काळ करावी या आणि इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटने कडून सांगोला तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनाचे रूपांतर सभेमध्ये झाल्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधताना शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील बोलत होते. यावेळी राज्यचिटणीस बाळासाहेब वाळके, शिवसेना नेते हरिभाऊ पाटील, बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे, किशोर बनसोडे, अशोक शिनगारे यांच्यासह शेतकरी संघटनेचे यासह समविचारी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
   पुढे बोलताना अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील म्हणाले, सन 2004 साली स्वाभिमानी शेतकरी संघटना काढली. आणि एफ आर पी चे राजकारण सुरू झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटना ही कारखानदारांची बाजू घेणारी संघटना झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून शेतकऱ्यांच्या हिताचे नव्हे तर शेतकऱ्यांच्या विरोधी निर्णय घेतले जात असून, आता त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव राहिली नाही असा टोला लगावत, आम्ही शेतकऱ्यांची बाजू मांडतोय त्यांना त्यात राजकारण सुचतंय असाही रघुनाथदादा पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर हल्लाबोल केला. यावेळी आज केलेल्या मागण्यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत शेतकरी संघटना आक्रमक राहील असाही इशारा त्यांनी या निमित्ताने दिला.
   यावेळी राज्य सरचिटणीस बाळासाहेब वाळके म्हणाले, सरकार  शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या बाबतीत अपयशी ठरत आहे.दुधाला दर नाहीत, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि विज बिल मध्ये देखील सरकार गांभीर्याने घेत नाही,  विविध खात्यामध्ये रिक्त जागांची मोठी संख्या आहे या आणि इतर प्रश्नावर त्यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. यासह शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात या पुढील काळात शेतकरी संघटना आक्रमकपणे लढा उभा करेल असे ही त्यांनी सांगितले.
   यावेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करून शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात आवाज उठवला. सदर शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या मागण्यांची निवेदन नायब तहसीलदार जाधव यांनी स्वीकारले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!