सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

आमदार शहाजीबापू पाटील यांना चिकमहूद ग्रामपंचायतीची सत्ता राखण्यात यश; ग्रामपंचायत निवडणुकीत शेकाप व मित्रपक्षाचा वरचष्मा

सांगोला(प्रतिनिधी):-आमदार शहाजीबापू पाटील यांनी स्वतःचे गाव असलेल्या चिकमहूद ग्रामपंचायतीची सत्ता राखण्यात यश मिळविले आहे. ग्रामपंचायतीच्या 15 पैकी 14 जागा आमदार पाटील यांच्या पॅनेलने जिंकल्या आहेत. गावची ग्रामपंचायत राखली असली तरी तालुक्यातील इतर सावे, वाढेगाव व खवासपूर या 3 ग्रामपंचायती शेतकरी कामगार पक्षाने व मित्रपक्षाने जिंकल्या आहेत. त्यामुळे शेकापची गेली काही वर्षांपासून सुरू असलेली विजय घेडदौड कायम आहे. 

सांगोला तालुक्यामध्ये चिकमहूद, खवासपूर, वाढेगाव आणि सावे या चार ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. या ग्रामपंचायतींसाठी रविवारी (ता. 5 नोव्हेंबर) चुरशीने 83.37 टक्के मतदान झाले होते. चिकमहूद ग्रामपंचायत ही आमदार शहाजी पाटील यांचे गाव आहे. संपूर्ण जिल्ह्याचे या ग्रामपंचायतीच्या निकालाकडे लक्ष लागले होते. या ग्रामपंचायतीवर पाटील यांनी सत्ता राखली असली तरी महूद ग्रामपंचायत सोडली तर इतर 3 ग्रामपंचायतींवर शेतकरी कामगार पक्षाने आपली सत्ता खेचून आणली आहे.
चिकमहूद ग्रामपंचायतीमध्ये एकूण 15 जागांपैकी निवडणुकीच्या दरम्यान एका उमेदवाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्यामुळे 14 जागांसाठी मतदान झाले होते. या 14 पैकी 13 जागा आमदार शहाजी पाटील यांच्या गटाने जिंकल्या आहेत, तर एक जागा विरोधकांना मिळविण्यात यश आले आहे. सरपंचपदही शहाजीबापू पाटील गटाने जिंकले आहे. शिवसेना (शिंदे) गटाच्या  शोभाताई सुरेश कदम यांनी सरपंचपदावर बाजी मारली.

 

 

वाढेगाव ग्रामपंचायतीवर माजी आमदार दीपकआबा  साळुंखे पाटील यांची सत्ता होती. या ग्रामपंचायतीमध्ये शेतकरी कामगार पक्ष व मित्रपक्षाने बाजी मारली असून, सरपंचपदासह 13 जागांपैकी 7 जागा जिंकल्या आहेत. यामुळे राष्ट्रवादीची ग्रामपंचायत शेकापने स्वतःकडे खेचून आणली आहे. या ठिकाणी पाटील गटाला पराभवाचे तोंड पाहावे लागले. शेकाप व मित्रपक्षाच्या  कोमल सुरेश डोईफोडे  यांनी सरपंचपदाच्या निवडणुकीत विजय मिळविला.

 

सावे ग्रामपंचायत ही पारंपरिक शेकापचा गड मानला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून या गावात शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती. ती या वेळीही त्यांनी टिकवली आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या दोन गटांतच या वेळी लढत झाली होती. असे असूनही सावे ग्रामपंचायतीमध्ये शेकापने  (शेजाळ गट) बाजी मारली आहे. शेकापचे (शेजाळ गट)  शिवाजी भैरु वाघमोडे यांनी सरपंचपदाच्या निवडणुकीत विजय मिळविला.

 

खवासपूर ग्रामपंचायत मागील दोन पंचवार्षिकपासून आमदार पाटील गटाकडे होती. या निवडणुकीत मात्र शेकाप व मित्रपक्षाने सरपंचपदासह 10-1 अशी सत्ता मिळविली आहे. खवासपूर ग्रामपंचायत ही आमदार शहाजी पाटील यांच्या चिकमहूद या पंचायत समिती गणामध्ये येते. त्या ठिकाणी पाटील गटाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.शेकाप व मित्रपक्षाचे गणेश वसंत दिक्षीत यांनी सरपंचपदाच्या निवडणुकीत विजय मिळविला.

शेतकरी कामगार पक्षाच्या विजयी उमेदवारांचे पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख व डॉ.अनिकेत देशमुख यांनी अभिनंदन केले. विजय शांततेत साजरा करण्याचे आवाहन त्यांनी या वेळी कार्यकर्त्यांना केले.

खवासपूर ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शेतकरी कामगार पक्षाला पाठिंबा दिला, तर वाढेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या एका गटाने शेतकरी कामगार पक्षाबरोबर तर दुसर्‍या गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर युती केली होती. खवासपूर आणि वाढेगाव या दोन्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शहाजीबापू पाटील आणि दीपकआबा साळुंखे यांचे कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध भिडल्यामुळे या दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पराभवाची धूळ चाखावी लागली आहे.

खवासपूर ग्रामपंचायतमध्ये शिवसेनेला, तर वाढेगाव ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता गमवावी लागली आहे. या दोन्ही ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे व मित्रपक्षाचे सरपंच निवडून आले आहेत.

सांगोला तालुका ग्रामपंचायत सरपंच पद निकाल
शेकाप 1 (सावे)
शिवसेना शिंदे गट 1 (चिकमहुद)
शेकाप – राष्ट्रवादी 1 (खवासपूर)
शेकाप शिंदे गट 1 (वाढेगाव)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!