बहुचर्चित सांगोला उपसा सिंचन योजनेला येत्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासकीय मान्यता देऊन चालू अर्थसंकल्पात निधीची तरतूद करणार ; उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या मागणीला अजितदादांचा ग्रीन सिग्नल ; सांगोला तालुक्यात उत्साहाचे वातावरण
उजनी धरणातून सांगोला तालुक्यासाठी तब्बल २ टी एम सी पाणी मंजूर होते. या योजनेचे तत्कालीन मुख्यमंत्री स्व विलासराव देशमुख यांच्याहस्ते साळमुख ता माळशिरस येथे भूमिपूजनही करण्यात आले होते. मात्र भूमीपुजनानंतर ही योजना रेंगाळली आणि सांगोला तालुक्याला पाणी मिळण्याची शक्यता धूसर झाली. परंतु सांगोला तालुक्याचे माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी वारंवार पाठपुरावा केला आहे. ही योजना पूर्ण करून सांगोला तालुक्याला हक्काचे २ टी एम सी पाणी देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून या योजनेची पूर्तता करण्यासाठी येत्या मंत्रिमंडळ (कॅबिनेट) बैठकीत या योजनेस अंतिम प्रशासकीय मान्यता देऊन हवा तितका निधी देऊ आणि ही योजना लवकरात लवकर पूर्ण करू यासाठी राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात भरघोस निधीची तरतूद करू असेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर येथील मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले. माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांची सोलापूर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच सोलापूर दौऱ्यावर आलेल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांचे सोलापुरात जंगी स्वागत करण्यात आले. या मेळाव्यासाठी सांगोला तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली.
यावेळी बोलताना माजी आमदार दिपकआबा म्हणाले, वर्षानुवर्षे मंत्रालयाच्या फायलीत अडकलेली योजना मार्गी लावल्यास सांगोला तालुक्याला यातून हक्काचे २ टी एम सी पाणी मंजूर होणार आहे. या पाण्यातून तालुक्यातील सिंचानापासून वंचित गावातील हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. कागदोपत्री पाणी मंजूर असूनही सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. शेतीला पाणी नाही, जनावरांना चारा नाही अशा परिस्थितीत राज्य सरकारने मायबाप जनतेवर कृपा दाखवावी आणि रखडलेल्या सांगोला उपसा सिंचन योजना अर्थात उजनी उपसा सिंचन योजनेला निधीची तरतूद करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी नुकत्याच सोलापूर येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली होती. या मेळाव्यात बोलताना दिपक आबांच्या मागणीला दादांनीही ग्रीन सिग्नल दिल्याने उजनीचे २ टी एम सी पाणी सांगोला तालुक्याला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सिंचनापासून वंचित गावांना होणार फायदा
सांगोला तालुका हा तालुका नैसर्गिकदृष्ट्या अवर्षणप्रवन असल्याने सातत्याने पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न दरवर्षी शेतकऱ्यांना सतावतो यावर शाश्वत मार्ग काढण्यासाठी सरकारने तालुक्यासाठी सांगोला उपसा सिंचन सारख्या योजनांना मान्यता देऊन या योजनांना निधीची तरतूद करावी अशी मागणी उप मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे आपण केली होती दादांनी याला सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरात लवकर ही योजना पूर्णत्वास नेण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतर सांगोला तालुक्यातील सिंचनापासून वंचित असणाऱ्या अनेक गावांना याचा लाभ होणार आहे.
मा आम. दिपकआबा साळुंखे पाटील
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर