सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

२०४७ पर्यंत देशात भाजपची सत्ता कायम राहणार – प्रशांत परिचारक

सांगोल्यात गाव चलो अभियानाची बैठक, मोदी की गॅरंटीचा नारा गावोगावी पोहचविला जाणार

सांगोला (प्रतिनिधी): आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तम संघटनात्मक बांधणी करत, विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून भाजप कार्य करत आहे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या दहा वर्षात केलेल्या कामांची माहिती भाजपच्या कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवावी. गाव चलो अभियानांतर्गत मोदी की गॅरंटीचा नारा गावोगावी पोहचविला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला दहा वर्षे पूर्ण झाली असून सरकारने विविध क्षेत्रात दमदार कामगिरी केली आहे. सक्षम कार्यकर्ता ही भाजपची ओळख असल्याने २०४७ पर्यंत केंद्रात भाजपची सत्ता कायम राहणार असल्याचा ठाम विश्वास माढा लोकसभा निवडणूक प्रमुख प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केला.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची विकासाची दृष्टी गरीबांच्या कल्याणाकडे घेऊन आणि सरकारने केलेली विकासकामे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी गाव चलो अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानासंदर्भात मंगळवार ६ फेब्रुवारी रोजी सांगोल्यात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी लोकसभा समन्वयक राजकुमार पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, जिल्हा सरचिटणीस सचिन शिंदे, तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर, लक्ष्मण केंकाण,शिवाजीराव गायकवाड, नवनाथ पवार, वसंत सुपेकर,नागेश जोशी, विस्तारक अनंत राऊत, हणमंत करचे अक्षय वाडकर यांच्यासह सुपर वॉरियर्स, गाव चलो अभियान कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना माढा लोकसभा निवडणूक प्रमुख प्रशांत परिचारक म्हणाले, मोदी सरकारच्या गेल्या दहा वर्षातील सर्वसामान्य जनतेसाठी राबवलेल्या सर्व योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजना प्रत्येक बूथवरील लाभार्थीपर्यंत पोचविण्यासाठी अभियान हाती घेण्यात आले आहे. आघाडीचे राजकारण देशाला मानवणारे नसल्याने जनतेने नरेंद्र मोदींना पसंती दिली आहे. आघाडी सरकारच्या काळात भष्टाचार, घोटाळ्यांच्या मालिका सुरू झाल्या. २०१४ पासून नरेंद्र मोदींचा झंझावात सुरू झाला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अब की बार ४०० पार चा नारा दिला आहे. त्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी संघटना मजबूत करून कामाला लागावे असे आवाहन प्रशांत परिचारक यांनी केले.
यावेळी बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत म्हणाले की, तळागाळातील प्रत्येक मतदारापर्यंत मोदी सरकारचे दहा वर्षातील प्रभावी कार्य, जाहीरनाम्यातील आश्वासनांची केलेली पूर्ती, विकसित भारताचा संकल्प सांगणाऱ्या अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी ही सर्व माहिती पोहोचण्याच्या उद्देशाने गाव चलो अभियान हाती घेण्यात आले आहे. मोदीजींची गॅरंटी काय आहे? हे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी मागच्या मोदी सरकारच्या योजना व उल्लेखनीय कामगिरीची माहिती देणारी पत्रके तळागाळातील जनतेपर्यंत वितरित करण्यात येणार आहेत. गाव चलो अभियानात बूथ प्रमुखांशी बैठक, मतदार यादीमधील लोकांशी चर्चा, कार्यकर्त्यांशी संवाद, नमो ॲप बाबत प्रचार, हॅन्ड बिल वाटप, युवकांसाठी नमो चषकचे आयोजन, सामाजिक संस्थांशी चर्चा असे कार्यक्रम राबविले जाणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार सावंत यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!