सांगोला तालुक्यात मोठ्या जल्लोषात शिवजयंती उत्साहात साजरी
सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त सांगोला शहरासह तालुका परिसर भगवामय झाला होता.जय शिवाजी जय भवानीच्या घोषणांनी शहर परिसर दुमदुमला होता.
सकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सांगोला तालुक्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह विविध गुणवंताचा गुणगौरव सोहळा सर्व आजी- माजी सैनिकांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मानेगाव येथील नारायण बाबर यांच्या अॅकॅडमीमधील मुलांनी साहसी खेळ, मल्लखांबचे प्रात्यक्षिक देखील करून दाखवले. सुभव अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी जयंतीनिमित्त भगवा ध्वज घेऊन 17 किमीची रॅली काढली होती. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संस्कार शितोळे याने रांगोळीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य चित्र साकरले होेते.
सकाळी 11 च्या सुमारास सांगोला शहरातील प्रमुख मार्गावरुन सर्व महापुरुषांना अभिवादन करत रॅली काढून एकतेचा संदेश देण्यात आला. रॅलीप्रसंगी सर्व जाती-धर्मातील बांधवाकडून शिवप्रेमींसाठी पाणी, नाष्टा, सरबत देण्यात आला. रॅलीप्रसंगी तालुक्यातील शिवप्रेमी नागरिक, महिला, तरुण वर्ग सहभागी झाले होते. यावेळी सर्व जाती धर्मातील लहान मुले, महिलांनी सांस्कृतीक वेशभूषा करुन नागरिकांची मने जिंकली होती. रॅलीमध्ये घोडे, उंट यांच्यासह ढोल ताशांचा देखील गजर करण्यात आला. रॅलीच्या सांगतानंतर संभाजी ब्रिगेड, शिवप्रेमी मंडळ व शिवसेना उपजिल्हा प्रमुख दत्तात्रय सावंत यांच्यासह सहकार्यातून शिवप्रेमींना भोजनांची व्यवस्था करण्यात आली होती. रॅलीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक भिमराव खणदाळे यांच्या मार्गदर्शनखाली सांगोला पोलीस स्टेशनकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रॅलीसाठी नगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील कर्मचार्यांनी देखील महत्वपूर्ण भूमिका बजाविली.
एकतेचा संदेश देण्यासाठी 18 फेब्रुवारी रोजी महात्मा फुले चौकातून रॅली काढण्यात आली होती.यावेळी महिलांची आणि विद्यार्थीनीची उपस्थिती लक्षणीय होती.
शिवजयंतीनिमित्त आमदार शहाजीबापू पाटील, पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख, भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, श्रीकांतदादा देशमुख, भरत शेळके साहेब, प्रांताधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार संतोष कणसे, पोलीस निरीक्षक भिमराव खणदाळे, मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांच्यासह शहर व परिसरातील विविध राजकीय पक्षासह सामाजिक संस्थाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, आजी-माजी नगरसेवक, जि.प.सदस्य, पत्रकार, विधीज्ञ, डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक बांधव, व्यापारी बांधव, सर्व धर्मिय समाज बांधव, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह सर्व जयंती मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी यांनी अभिवादन केले.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शिवप्रेमी मंडळाच्या पदाधिकारी यांच्यासह सर्व शिवभक्तांनी परिश्रम घेतले.