भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणाने पक्षाचे काम करावे – बाळा भेगडे

सांगोला (प्रतिनिधी): आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे मायक्रो प्लॅनिंगने काम सुरू आहे. कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संघटनात्मक काम करण्याची संधी देण्यासाठी दोन जिल्हाध्यक्ष निवडले आहेत. जो पदाधिकारी आगामी तीन महिन्यात काम करणार नसेल त्या पदाधिकाऱ्यांना संघटनेत संधी मिळणार नाही. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपची जनसंवाद यात्रा सुरू आहे. फिर एक बार मोदी सरकार… बार बार मोदी सरकार यासाठी १ ऑक्टोंबर ते १५ ऑक्टोंबरपासून प्रत्येक बूथमध्ये कमळ चिन्हांचे भिंतींवर पेंटिग करण्यात येणार आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणाने पक्षाचे काम करावे असे मत भाजपचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी बाळा भेगडे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त केले.
      भाजपची सोलापूर जिल्हा पश्चिम ग्रामीण पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक सांगोल्यात आयोजित करण्यात आली होती. भाजप इलेक्शन मोडमध्ये आली असल्याने जिल्हाध्यक्ष निवडीनंतर आता जिल्हा, तालुका पदाधिकारी निवडी करण्यासाठी बाळा भेगडे सांगोल्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना बाळा भेगडे यांनी प्रत्येक पदाधिकाऱ्यांना १ हजार सरल ॲप डाऊनलोड करण्याच्या सूचना दिल्या. कार्यकर्ते उभे करण्याचे काम करणारा भाजप पक्ष आहे. सत्ता नसताना पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक भाजपने जिंकली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजपचा विचार तळागाळात पोहोचविण्यासाठी काम करण्याच्या सूचना दिल्या.
          यावेळी खासदार रणजितसिंह निंबाळकर, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी बाळा भेगडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील, शशिकांत चव्हाण, समन्वयक राजकुमार पाटील, के.के. पाटील, जयकुमार शिंदे, महिला आघाडीच्या अध्यक्षा धनगरी खटके- पाटील, भटक्या विमुक्त महिला जिल्हाध्यक्षा माया माने यांच्यासह सांगोला, बार्शी, माढा, करमाळा, माळशिरस या तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
        भाजपच्या जिल्ह्याची कार्यकारणी ९० जणांची असणार आहे. १० उपाध्यक्ष, १० सचिव, ४ सरचिटणीस, कोषाध्यक्ष, जिल्हा कार्यकारणी सदस्य अशी असणार आहे. २६ आघाड्या व मोर्चा असणार आहेत. राज्यात २५ तारखेपर्यंत जिल्ह्याची कार्यकारणी निवडी करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती भाजपचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी बाळा भेगडे यांनी दिली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी भाजपच्या बैठकीचा विषय विषद करून मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button