पाणीप्रश्नांच्या पाठपुराव्याला यश, विस्तारित टेंभूसाठी ७५३ कोटींची निविदा प्रसिद्ध – आमदार शहाजीबापू पाटील

सांगोला (प्रतिनिधी): टेंभू उपसा सिंचन योजनेच्या अतिरिक्त आठ टीएमसी पाणी वाटपाच्या आराखड्याला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे. सांगोला तालुक्याचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी तसेच टेंभू, म्हैसाळ योजनेची अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे वारंवार पाठपुरावा सुरू आहे. या पाठपुराव्याला यश आले आहे. विस्तारित टेंभू योजनेच्या कामाची ७५३ कोटी ७९ लाख रुपयांची निविदा शासनाने काढली असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
. विस्तारित टेंभू उपसा सिंचन योजना आणि म्हैसाळ योजनेस मंजुरी मिळावी, यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे वारंवार पाठपुरावा केला होता. सांगोला तालुक्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी शासनाने विस्तारित टेंभू योजनेच्या कामांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यातील गावे ओलिताखाली येणार आहेत. विस्तारित योजनेसाठीही पुढाकार घेऊन पाठपुरावा केल्याने महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने सुमारे ७५३ कोटी ७९ लाख रुपयांच्या कामाची ई-निविदा काढल्याने माझ्या राजकीय इतिहासातील महत्त्वाचे काम पूर्ण झाले असे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
टेंभू योजनेच्या विस्तारित कामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असून यातून बेवनूर थेट गुरुत्व नलिका व त्यावरील वितरिका, लघुवितरिकांचे काम बंदिस्त पाईपलाईन पद्धतीने करणे, पुढील पाच वर्षासाठी देखभाल दुरुस्ती व परीचलन करण्यात येणार आहे. तसेच सातत्याने पाठपुरावा केल्याने म्हैशाळ उपसा सिंचन योजनेमध्ये नवीन ८ वंचित गावांचा समावेश केल्याने आता म्हैशाळ योजनेमध्ये घेरडी, सोनंद, पारे, वाकी घेरडी, वाणीचिंचाळे, आलेगाव, मेडशिंगी, तरंगेवाडी, भोपसेवाडी, जवळा व आगलावेवाडी या गावांसह पारे, हंगिरगे, जवळा व नराळे येथील तलावांचा समावेश करण्यात आला आहे.
तसेच टेंभू योजनेतील कामत गुरुत्व नलिकेतून ५ हजार ४३१ हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणार आहे. तर डोंगरगाव, हणमंतगाव, मानेगाव, काळूबाळूवाडी, गुणापाचीवाडी व हटकर मंगेवाडी या सहा गावांना ९०३ हेक्टर क्षेत्राला बेवनूर गुरुत्व नलिकेतून पाणी मिळणार आहे. एकूणच १९ गावांमधील ६ हजार ३३४ हेक्टर क्षेत्राला या एक टीएमसी पाण्याचा लाभ मिळणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
चौकट
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत सांगोल्यासाठी पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्याची मागणी केली आहे. यावेळी उन्हाची तीव्रता लक्षात घेवून उन्हाळी हंगामासाठी दोन महिने कालवा चालविण्याचे ठरले आहे. पाण्याची गरज लागली तर त्यापुढे आठ दहा दिवस. कालवा चालविण्याचे ठरले आहे असे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.