टेंभू योजनेच्या विस्तारासाठी शुक्रवारी सांगोल्यात लोकसुनावणी ; मा आम. दिपकआबा साळुंखे पाटील
लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी सुनावणीला उपस्थित राहण्याचे दिपकआबांचे आवाहन

दुष्काळी सांगोला तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या टेंभू उपसा सिंचन योजनेच्या विस्तारीकरणास नुकताच महाराष्ट्र राज्य सरकारने ग्रीन सिग्नल दिला आहे. या योजनेच्या विस्तारीकरणाची टेंडर प्रक्रिया सुरू केल्यानंतर शुक्रवार दि १ मार्च रोजी टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विस्तारीकरण बाबत सांगोला येथे पंचायत समिती बचत भवन येथे दू २.३० वा. पर्यावरण विषयक जाहीर लोकसनावणी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिली. या लोक सुनावणीस टेंभू योजनेच्या विस्तारीकरणात येणाऱ्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
टेंभू योजनेच्या विस्तारीकरणात सांगोला तालुक्यातील टेंभूच्या पाण्यापासून वंचित गावांना तब्बल एक टी.एम.सी. अतिरिक्त पाणी मिळणार आहे. या पाण्यातून तब्बल ३ हजार १९५ हेक्टर इतके क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. महाराष्ट्र शासनाकडे टेंभू योजनेच्या विस्तारीकरणाबाबत आपण वारंवार पाठपुरावा केल्याने या योजनेच्या विस्तारीकरणास अखेर ग्रीन सिग्नल मिळाला आहे. टेंभू उपसा सिंचन योजनेच्या विस्तारीकरणामुळे तालुक्यातील कामथ वितरीका अंतर्गत लोटेवाडी जुनी व नवी, खवासपूर, अजनाळे, लिगाडेवाडी, वझरे, चिनके, सोनलवाडी व य मंगेवाडी तसेच बेवनुर वितरिका अंतर्गत डोंगरगाव, हनमंतगाव, मानेगाव, काळूबाळूवाडी, गुणापवाडी व हटकर मंगेवाडी तर बुद्धेहाळ वितरिका अंतर्गत बुद्धेहाळ, चोपडी, हातीद, पाचेगाव खु, सोमेवाडी व बंडगरवाडी या गावांचा नव्याने समावेश होणार आहे.
तरी शुक्रवार दि १ मार्च रोजी सांगोला येथील बचत भवन येथे होणाऱ्या पर्यावरण विषयक जाहीर लोक सुनावणीत या परिसरातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहून टेंभू योजनेच्या विस्तारीकरणास सकारात्मक प्रतिसाद नोंदवावा असेही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी आवर्जून नमूद केले. जेणेकरून लवकरात लवकर विस्तारीकरणाचे काम पूर्ण होऊन सांगोला तालुक्यातील वंचित गावांना हक्काचे १ टी.एम.सी. पाणी नियमितपणे मिळण्यास मदत होईल.