पालकांनी मुलांना भावनिक पातळीवर समजून घ्यावे- सुनील जवंजाळ*
*नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये पालकांसाठी कार्यशाळा संपन्न*

नाझरा(वार्ताहार):’ मुलांच्या सर्वांगीण विकासात शाळेचा,समाजाचा व पालकांचा महत्त्वाचा वाटा असतो. खर तर या सर्वांमध्ये पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.घरात वावरणारा आपला पाल्य भावनिक दृष्ट्या सुदृढ होण्यासाठी प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाला भावनिक पातळीवर समजून घ्यायला हवे असे प्रतिपादन कवी सुनील जवंजाळ यांनी केले.
नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आयोजित केलेल्या पालकांच्या कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर प्राचार्य मंगल पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री. जवंजाळ म्हणाले की सध्या स्पर्धेच्या युगात आपला पाल्य सतत पुढे असायला हवा अशी पालकांची प्रचंड इच्छा असते त्यासाठी ते सातत्याने आपल्या पाल्यावर अभ्यास करण्याबाबतचे दबाव तंत्र वापरत असतात. खरंतर आपल्या पाल्याला आपण भावनिक पातळीवर समजून घ्यायला हवे, त्याची बुद्धिमत्ता, त्याची आवड व त्याची गुणवत्ता यानुसार त्याला क्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करायला हवे.तुम्हाला काय आवडते यापेक्षा आपल्या मुलाला काय आवडते हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
यावेळी त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून पालक आणि बालक यांचा संवाद आणि त्यांच्या संवादातून होणारी शैक्षणिक उन्नती याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.यावेळी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धा व प्रश्नमंजुषा स्पर्धा यातील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदाटे मॅडमनी केले तर आभार यांनी सरगर मॅडम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल मधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.सदर पालक कार्यशाळेस 100 च्या वरती पालक उपस्थित होते. अनेक पालकांनी कार्यशाळेबाबत समाधान व्यक्त करत इंग्लिश मीडियम स्कूलच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल धन्यवाद दिले.