राजकीयमहाराष्ट्र

निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी           – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

सोलापूर,:- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत सोलापूर व माढा लोकसभा मतदार संघासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व  अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी व ही निवडणूक प्रक्रिया शांततामय व निर्भयपणे होईल यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.

नियोजन भवन येथे आयोजित लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 पूर्व तयारी आढावा बैठकीत मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, पोलीस  अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उप जिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यासह सर्व सहायक निवडणूक अधिकारी, सर्व नोडल अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.

मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे पुढे म्हणाले की, लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी सर्व नोडल अधिकारी पोलीस अधिकारी यांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे गांभीर्यपूर्वक आपली जबाबदारी पार पाडावी. निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. स्ट्रॉंग रूमसह ईव्हीएम मशीन बाबत अत्यंत काळजीपूर्वक काम करावे. इतर जिल्ह्यातून दारू, पैसा व अन्य संबंधित बाबी आपल्या जिल्ह्यात येणार नाहीत यासाठी जिल्ह्याच्या सीमेवर चेक पोस्ट तयार करावेत. तसेच आंतर राज्य सीमेवर ही चेक पोस्ट तयार करून तिथे निवडणूक पथके नियुक्त करावेत असेही त्यांनी सूचित केले.

भारत निवडणूक आयोगाने या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होम वोटिंग हा पर्याय 80 वर्षापेक्षा अधिक वय असलेले मतदार तसेच दिव्यांग मतदारासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यात जवळपास सव्वा लाख 80 वर्षे वय असलेले व दिव्यांग मतदार आहेत. निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर तात्काळ डी-12 चा फॉर्म या मतदारापर्यंत पोहोचवून त्यांच्याकडून घरातून मतदान करणार की मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणार याची माहिती भरून घ्यावी. घरून मतदान करण्यासाठीची प्रक्रिया व त्यासाठी आवश्यक असलेला पोलिंग स्टाफ यांची नियुक्ती करावी व त्यांना निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे प्रशिक्षण द्यावे असे निर्देशही मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी दिले.

लोकशाहीच्या या उत्सावात  जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घ्यावा यासाठी स्वीप ची प्रक्रिया अत्यंत प्रभावीपणे राबवावी व जास्तीत जास्त प्रमाणात मतदाराची नोंदणी करून मतदारांनी मतदान प्रक्रियेत उत्साहाने सहभागी व्हावे यासाठी त्यांचे प्रबोधन करावे. प्रत्येक मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांगासाठी रॅम्प, त्याचबरोबर महिला व पुरुष मतदारांसाठी स्वतंत्र शौचालयाच्या सुविधा आहेत की नाहीत याची पुन्हा एकदा व्यवस्थित खात्री करून घ्यावी, असे निर्देश श्री. देशपांडे यांनी दिले.

प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हा प्रशासाच्यावतीने लोकसभा निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली. जिल्ह्यात लोकसभेचे 42- सोलापूर (अनुसूचित जातीसाठी राखीव) व 43 -माढा असे दोन मतदार संघ आहेत. जिल्ह्यात 11 विधानसभा मतदारसंघ असून 3 हजार 599 मतदान केंद्र आहेत. यातील नागरी भागात 1 हजार 243 तर ग्रामीण 2 हजार 356 मतदान केंद्र आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार 43 लाख 17 हजार 756 तर 2024 मध्ये अंदाजे लोकसंख्या 47 लाख 26 हजार 143 इतकी आहे. सोलापूर जिल्ह्याची सीमा राज्यातील सात जिल्ह्याला लागून असून, अंतर राज्य सीमा कर्नाटक राज्यातील कलबुर्गी आणि विजयपूर जिल्ह्याला लागून आहे. तर मागील लोकसभा निवडणुकीत 61.28 टक्के मतदान झालेले होते, अशी माहिती त्यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्याची 27 फेब्रुवारी 2024 अखेर मतदार संख्या 36 लाख 7 हजार 531 इतकी असून, त्यातील पुरुष मतदार 18 लाख 67 हजार 138 तर महिला मतदार 17 लाख 40 हजार 109 इतके आहेत. तृतीयपंथी मतदार संख्या 284, परदेशात गेलेले मतदार 54, दिव्यांग मतदार 27 हजार 04 व 80 वर्षापेक्षा अधिक वय असलेले मतदार 1 लाख 6 हजार 139 तर 100 वय वर्ष पेक्षा अधिकचे मतदार 3 हजार 23, सर्विस मतदार 4 हजार 616 इतके आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली. त्याप्रमाणेच निवडणुकीसाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्धता, नवीन मतदार नोंदणीसाठी केलेले प्रयत्न, मतदार यादीतील मतदारांची नावे वगळणे याबाबत केलेली कार्यवाही, स्ट्रॉंग रूम, ईव्हीएम मशीन, आदर्श मतदान केंद्र, मतदानासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण हे अनुषंगाने सविस्तर माहिती त्यांनी दिली.

यावेळी नागरी व ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर व एकूण निवडणूक प्रक्रियेत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस बंदोबस्ताच्या अनुषंगाने पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार व पोलीस अधीक्षक सरदेशपांडे यांनी माहिती दिली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्त केलेले नोडल अधिकारी व विविध समित्यांची यावेळी माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!