डोंगर पाचेगाव येथे अज्ञात कारणावरून वयोवृद्ध पती पत्नीचा खून

सांगोला (प्रतिनिधी) अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून वयोवृद्ध पती पत्नीचा खून केल्याची घटना शुक्रवार दि.१ मार्च रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास डोंगर पाचेगाव ता.सांगोला येथे उघडकीस आली आहे.भिमराव गणपत कुंभार वय ७० व सुशिला भिमराव कुंभार वय ६५ असे खून झालेल्या पती पत्नीचे नाव आहे.
सागर रामचंद्र कुंभार वय २९ रा. करगणी ता. आटपाडी जि. सांगली यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार फिर्यादीने माहिती मिळाल्या नंतर पाचेगाव येथील घरात जावून पाहिले असता घरातील सामान अस्ताव्यस्त विखरलेले होते आजी सुशीला हिला छतावर जाणेसाठी असलेले जिन्यात पायरीवर गळ्याला केबल वायरने आवळलेले तसेच तीच्या तोंडातुन, कानातुन रक्त आलेले तर डावा हात मोडल्यासारखा दिसत होता ,तीच्या डोकीत मागील बाजुस जखम होवुन रक्त आलेले व ती मयत झालेली होती तसेच जिन्यातुन वर गेलो असता छतावर आजोबा भिमराव कुंभार जमीनीवर पडलेले होते. त्याच्या डाव्या गळ्यातुन एक मोठी लोखंडी मेख आरपार खुपसलेली होती, अंगावर, हातावर व पायावर खरचटलेले मयत होवुन पडलेले दिसत होते. आजोबा भिमराव कुंभार व आजी सुशिला कुंभार या दोघाना कोणी, कधी आणि कशासाठी मारले हे फिर्यादी सागर कुंभार याने माहिती नसल्याचे सांगितले याबाबत सागर कुंभार याने आजोबा भीमराव कुंभार व आजी सुशीला कुंभार यांना १ मार्च रोजी सायंकाळी ७ वा.पूर्वी कोणीतरी अज्ञात इसमाने, अज्ञात कारणाने आजोबा भिमराव कुंभार यांना लोखंडी मेख गळ्यात आरपार खुपसून गंभीर जखमी करुन आणि आजी सुशिला कुंभार हीस गळ्यास केबल गुंडाळुन आणि डोकीस पाठीमागे कशाने तरी मारुन, डोके आपटुन गंभीर जखमी करुन दोघांचा खुन केला आहे, म्हणुन अज्ञात इसमाच्या विरुध्द फिर्याद दाखल केली आहे.
*या खून प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांची पाच तपास पथके तयार केली असून सर्व शक्यता गृहीत धरून तपास सुरू आहे लवकरच खुनाचे धागेदोरे उलगडून आरोपीस ताब्यात घेतले जाईल असे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम गायकवाड यांनी सांगितले.