*शिक्षक भरतीत निवड झाल्याबद्दल विविध ठिकाणी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न*

नाझरे,ता.1: शिक्षक अभियोग्यता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या नाझरे,वझरे येथील यशस्वी विद्यार्थ्यांचा दोन्ही गावातील ग्रामस्थांच्या वतीने तसेच सांगोला तालुक्यातील शेकापचे युवा नेते अनिकेत देशमुख,उदय दुध उत्पादक संस्था नाझरे, मुस्लिम समाज संघटना नाझरे, मा.जि.प.सदस्य सचिन देशमुख,कोळे ग्रामस्थ,सावित्रीबाई फुले अभ्यासिका नाझरे,राहुल दुधाळ मित्रपरिवार सांगोला यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
शिक्षक भरतीचा निकाल लागून एका वर्षांनंतर या सर्व विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये मोठे समाधान दिसून येत होते.
यावेळी प्रथमच शिक्षक भरतीत निवड झाल्याबद्दल विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. सहसा असे सत्कार अधिकारी पदावर निवड झाल्यानंतर केले जातात.परंतु आजच्या या स्पर्धेच्या युगात शिक्षक म्हणून निवड होणे हे देखील मोठे आव्हानात्मक असून या विद्यार्थ्यांनी त्यात यश मिळवल्याबद्दल सत्कार करताना नागरिकांमध्ये मोठा आनंद दिसून येत होता.
शिक्षक पात्र परीक्षेत यशस्वी झालेले विद्यार्थी अमर तांबोळी, अमित खंडागळे,प्रणव राज शेटे,प्रदीप पाटील, यशवंत खरात या सर्वांचा सत्कार ठिकठिकाणी करण्यात आला.
सत्कार प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षक म्हणून झालेली निवड सार्थ ठरवून विद्यार्थ्यांना योग्य व चांगले शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध राहू अशी व शिक्षणासोबतच मुलांचा नैतिक विकास देखील करत राहु असे या विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.