सांगोला तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई व चारा टंचाई याबाबत तत्काळ उपाययोजना करावी : शेतकरी कामगार पक्षाची मागणी

सांगोला तालुका व परिसरात सन २०२३-२४ या वर्षी सरासरी पेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने सद्यपरिस्थितीमध्ये संपूर्ण सांगोला तालुक्यात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. यामुळे तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवरती पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाल्याने तसेच गेल्या काही काळात तालुक्यात पशुधनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असुन, अपुर्या पर्जन्याअभावी पशुधन जगवण्याची पुढील काळात मोठी कसरत करावी लागणार आहे. तरी पशुधन वाचवण्यासाठी शासन पातळीवर लवकरात लवकर चाऱ्याची व्यवस्था करून शेतकरी वर्गाला न्याय द्यावा अन्यथा याबाबत त्वरित निर्णय न झाल्यास रस्त्यावर उतरून जनआंदोलन करू असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
सदरचे निवेदन शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी तहसीलदार संतोष कणसे यांना देण्यात आले.
सदरचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,पालकमंत्री, जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांना देण्यात आले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सदर निवेदन देतेवेळी शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी – कार्यकर्ते तसेच विविध दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन व सदस्य, विविध संस्थेचे चेअरमन व संचालक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.