सांगोला महाविद्यालयातील इतिहास विभागामार्फत अभ्यास सहल

सांगोला / प्रतिनिधी : सांगोला महाविद्यालयातील इतिहास विभागामार्फत या शैक्षणिक वर्षातील अभ्यास सहलीचे नियोजन करण्यात आले होते. या नियोजानांतर्गत विभागातील एकूण २४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. दिनांक ६ मार्च रोजी बीड येथील कंकालेश्वर या हेमाडपंती मंदिर वास्तुकलेचे आणि त्या मंदिरावरील मूर्ती कलेची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर औरंगाबाद शहरातील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेटी देण्यात आले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसराची माहिती देऊन येथील इतिहास विभागाच्या वस्तुसंग्रहालयास भेट देऊन विद्यार्थ्यांनी प्राचीन वस्तूंची माहिती जाणून घेतली. त्यानंतर सोनेरी महल या महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या विभागीय कार्यालयास व त्यामध्ये असलेल्या पुरातत्वीय व ऐतिहासिक वस्तुसंग्रहालायास भेट देऊन मराठवाड्यातील पैठण,भोकरधन आणि तेर येथील उत्खननामध्ये मिळालेल्या पुरातत्वीय साधनांची माहिती विद्यार्थ्यांनी आत्मसात केली. त्यानंतर मुघलकालीन जलव्यवस्थानासाठी महत्वाची असणारी पाणचक्की या पर्यटन स्थळाला भेट दिली. तसेच दख्खन चा ताज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, जागतिक पर्यटनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणाऱ्या बी.बी.का मकबरा या वास्तूची माहिती जाणून घेतली.
दिनांक ७ मार्च रोजी वेरूळ येथील बारा ज्योतीर्लीग पैकी एक असणाऱ्या घृष्णेश्वर या धार्मिक पर्यटन केंद्रास भेट दिली तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या प्रसिद्ध शिवालय तीर्थकुंड विषयी माहिती घेतली. तसेच शहाजीराजे भोसले स्मारकास भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. त्यानंतर जगप्रसिद्ध वेरूळ लेणी मधील बौद्ध,हिंदू व जैन लेणी पाहून लयन स्थापत्यशास्त्राचा अभ्यास केला व येथील कैलास लेणी समूहाची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली. खुल्ताबाद येथील मुघलकालीन बनी बेगम बाग या वास्तुकले विषयी माहिती दिली व प्रसिद्ध धार्मिक ठिकाण भद्रामारुतीचे दर्शन करण्यात आले.तसेच महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या गड किल्यापैकी अतिशय दुर्गम अशा दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्याला भेट दिली व दुर्गस्थापत्य विषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर शिर्डी साईबाबा मंदिरास भेट दिली व दर्शन घेण्यात आले.
इतिहास अभ्यासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असेलेल्या ऐतिहासिक व पुरातत्वीय साधनाची माहिती घेतली धार्मिक पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन, मुघल स्थापत्य आणि कला,पुरातत्वीय साधने ऐतिहासिक साधने,लेणी स्थापत्य आणि गडकिल्यांची पाहणी करून विद्यार्थ्यांना क्षेत्र भेटीतून इतिहासाची माहिती देण्यात आली. सदरील शैक्षणिक सहल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख डॉ.सदाशिव देवकर आणि डॉ.महेश घाडगे यांनी यशस्वी केली.