सांगोला तालुका

कासाळगंगा प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करणार

 कटफळ ते शेळवे ग्रामस्थ प्रतिनिधींच्या बैठकीत निर्णय

महूद, ता. २९ : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील ७५ नद्या अमृतवाहिनी करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.या “चला जाणूया नदीला” या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या कासाळगंगा प्रकल्पाचा विकास आराखडा तयार केला जाणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला,माळशिरस व पंढरपूर या तीन तालुक्यातून वाहणाऱ्या कासाळगंगा प्रकल्प ची निवड करण्यात आली आहे.या प्रकल्पाचे उगमस्थान कटफळ(ता.सांगोला) ते भीमा नदी संगमस्थान शेळवे(ता.पंढरपूर)दरम्यान असलेली २३ गावे व वाड्या-वस्त्यांमधील प्रतिनिधींची बैठक नुकतीच महूद येथे झाली.या बैठकीत गावनिहाय शिवारफेरी, ग्रामस्थांची बैठक आणि विकास आराखडा तयार करणे असा कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.पुणे येथील ‘यशदा’चे माजी संचालक डॉ.सुमंत पांडे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.महाराष्ट्र जलबिरादरीचे अध्यक्ष नरेंद्र चुग,विनोद बोधनकर,विशेष कार्य अधिकारी सुधीर राठोड,अभिनेते चिन्मय उदगीरकर,डॉ. श्रीनिवास वडगबाळकर यांनी या बैठकीस ऑनलाइन मार्गदर्शन केले.

या बैठकीस बाळासाहेब ढाळे,बाळासाहेब शिंदे,बाळासाहेब पाटील,दीपक रुपनर, सुर्यकांत इनामदार,शंकर मेटकरी,दिलीप नागणे,अनिकेत महाजन,शशिकांत महामुनी,लालासाहेब मुलाणी,प्रभाकर कांबळे,महादेव येळे,दीपक धोकटे,धनंजय महाजन,ॲड्.धनंजय मेटकरी,सिद्धेश्वर येडगे,राजेश यलमर,धनंजय दुपडे,बाळासाहेब बंडगर,बाळासाहेब यलमर,रवींद्र कदम,विजय राजमाने, श्रीशैल्य पाटील,सतीश नागणे हे उपस्थित होते.लोकसहभाग,जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट,टाटा ट्रस्ट,रयत शिक्षण संस्था आदींच्या सहकार्यातून या २३ गावातून वाहणाऱ्या कासाळगंगा प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे.या पुनरुज्जीवन प्रकल्पामुळे २३ गावे व वाड्या-वस्त्यांना झालेल्या फायदा बद्दलची माहिती प्रतिनिधींनी या बैठकीत दिली.तसेच हा कासाळगंगा प्रकल्प अमृतवाहिनी होण्यासाठी आणखी कोणत्या कामांची आवश्यकता आहे याबद्दलची चर्चा या बैठकीत झाली.या कामाचा आराखडा करण्यासाठी कृषी विभागाचे निवृत्त अधिकारी शशिकांत महामुनी आणि अभियंता अनिकेत महाजन यांचे सहकार्य लाभणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. वाडीकुरोलीचे समाधान काळे यांनी या उपक्रमात ग्रामस्थांसह सक्रिय सहभाग नोंदवणार असल्याचे यावेळी सांगितले.

 शिवार फेरी,ग्रामस्थ चर्चा व विकास आराखडा कार्यक्रम

१ नोव्हेंबर -कटफळ व चिकमहूद, २ नोव्हेंबर – महूद, ३ नोव्हेंबर -महिम, ४ नोव्हेंबर – गार्डी व लोणारवाडी, ५ नोव्हेंबर- पळशी व सुपली, ६ नोव्हेंबर – वाडीकुरोली, ७ नोव्हेंबर-भंडीशेगाव व उपरी, ८ नोव्हेंबर- शेळवे, १ ते १० डिसेंबर – खिलारवाडी, गायगव्हाण,बचेरी,शिंगोर्णी,कोळेगाव असा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!