काय ती कामे….काय तो कामाचा दर्जा… काय ती दिली जाणारी उडवाउडवीची उत्तरे
पाच तासाहून अधिक वेळ चालली सांगोल्याची आमसभा....नागरिकांनी पाडला समस्यांचा पाऊस....

सांगोला(प्रतिनिधी):-काय ती कामे….काय तो कामाचा दर्जा… काय ती दिली जाणारे उडवाउडवीची उत्तरे…तालुक्यातील कामे चांगल्या पध्दतीने होत नाहीत यासह जलजीवन मिशन योजनेची कामे निकृष्ट झाली असून, जलजीवन योजनेची कामे थांबवा अन्यथा काम करु देणार नाही, अशा संतप्त प्रतिक्रया ऐकावयास मिळाल्या आमसभेत. या आमसभेत नागरिकांनी प्रश्नांचा भडिमार करुन अधिकार्यांना धारेवर धरले. आमसभेत नागरिकांच्या समस्येचा पाऊस पडल्याने ही आमसभा पाच तासाहून अधिक वेळ चालली.
पंचायत राज समितीच्या शिफारशीनुसार सांगोला पंचायत समितीची सन 2023-2024 ची आमसभा गुरुवार दिनांक 14 मार्च रोजी सकाळी 11 वाजता मा. आमदार अॅड. श्री. शहाजीबापू पाटील यांचे अध्यक्षतेखाली पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह (टाऊन हॉल), सांगोला येथे संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर आ.शहाजीबापू पाटील, मा.आ.दिपकआबा साळुंखे-पाटील, डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह तालुक्यातील सर्व शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आमसभेमध्ये मागील आमसभेमधील प्रश्न प्रलंबीत असताना मग आजची आमसभा कशाला, तालुक्यात जलजीवन योजनेची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असताना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. ब्रँच 5 ची पाण्याची असलेली दुरावस्था,पैसे टाकून पाणी पिल्यावर पाण्याचा प्रश्न कसा मिटणार, तालुक्यातील सुरु असलेला अवैध वाळू उपसा, वाळू उपसा करताना पिकातून वाहने गेल्यामुळे झालेल्या नुकसान, लोकप्रतिनिधींच्या नावाचा गैरवापर, एसटी कोलमडलेले वेळापत्रक, सर्वसामान्य लोकांना वाळू वाल्यांकडून दिला जाणारा त्रास..सांगोला येथील टाऊनहॉल नूतनीकरणींचा विषय.., टाऊन हॉलचे टेंडर मोठे परंतु काम निकृष्ठ, टाऊन हॉलमधील यापुर्वीच्या खुर्च्यांचे काय झाले.. मर्यादेपेक्षा अधिक कालावधीत लागणारे डिजीटल बोर्ड, यासह वीज विषयक तक्रारी, फळबाग अनुदान, चोर्या, जनावरे चोरी, टेंभू म्हैसाळ, निरा उजवा कालवा फाट आदी प्रश्नांवर नागरिकांनी प्रशासनास धारेवर धरले.
आमसभेत लागला विद्यार्थींनीचा प्रश्न मार्गी…गावास मिळणार 20 लाखाचे बस स्टॅण्ड
कमलापूर येथील एका विद्यार्थीनीने एस.टी थांबत नाही आणि एस टी बसस्थानक नाही याबाबत प्रश्न मांडला होता. या मागणीची दखल घेऊन आ.शहाजीबापू पाटील यांनी त्वरीत 20 लाखाचे बस स्टँण्ड देवू अशी घोषणा केली व एस.टी.डेपोतील अधिकार्यांने लगेचच बस थांबली जाईल अशी घोषणा केली. या विद्यार्थींनीने आमसभेत येऊन सर्वच विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लावला त्याबद्दल तिचे यावेळी अभिनंदन होत होते.