सांगोला महाविद्यालयात महिला दिनानिमित्त आरोग्य विषयक प्रबोधन कार्यक्रम संपन्न

सांगोला/प्रतिनिधी : सांगोला महाविद्यालयात दि 13 मार्च 2024 रोजी महिला दिवस साजरा करण्यात आला. अस्तित्व सामाजिक संस्था व सांगोला महाविद्यालय सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त प्रबोधनासाठी महाविद्यालयातील मुलींना “ मुलींचे आरोग्य काळजी व प्रतिबंध ” या विषयावर डॉ. श्रद्धा जवंजाळ यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले हे उपस्थित होते.
डॉ. श्रध्दा जवंजाळ यांनी आपल्या मनोगतात स्वतःच्या डॉक्टरी पेशातील अनुभवातून अभ्यासपूर्ण अशी माहिती देताना मुलींना आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे सष्टपणे मुलींसमोर मांडले. स्वतःचे आरोग्य कुटुंबासाठी किती महत्त्वाचे आहे त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये यावर अत्यंत आवश्यक शास्त्रीय माहिती त्यांनी सांगितली. मुलीनी आपली शारीरिक तपासणी वेळोवेळी का करून घ्यावी यावर माहिती देताना कोणत्याही आजाराच्या लक्षणाकडे गांभीर्याने पाहिले तर वेळेत इलाज होऊ शकतो व कॅन्सर सारख्या गंभीर आजारापासून आपण दूर राहू शकतो. यावर बहुमोल असे मार्गदर्शन केले. तसेच गर्भाशयाच्या कॅन्सरवर लसीकरणाचीही त्यांनी माहिती दिली व या संदर्भातील लस घेतल्यास कॅन्सरला ही प्रतिबंध करता येतो यावर आपले मत मांडले.
यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविदयालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी मुलींनी स्वतःची आरोग्य विषयक काळजी घेतली तर कुटुंब ही सुदृढ राहू शकतील यावर आपले विचार मांडले. या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात महिला प्राध्यापकांचाही प्रमुख पाहुणे डॉ. श्रध्दा जवंजाळ यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. विद्या जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. रोशनी शेवाळे यांनी केले व सूत्रसंचालन प्रा. अपूर्वा गोपलकर यांनी केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्री. शहाजी गडहिरे यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. डॉ. रमेश बुगड व महिला तक्रार निवारण समितीच्या डॉ. चित्रा जांभळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा लाभ 100 हून अधिक विद्यार्थीनी व महिला प्राध्यापकांनी घेतला.