नद्या संवर्धनासाठी विविध उपक्रम

वाडेगाव – महाराष्ट्र शासनाच्या अमृत महोत्सव नदीयात्रा उपक्रमातून ‘चला जाऊया नदीला’ अभियानांतर्गत नद्यांचे पावित्र्य टिकावे व नदीपात्राचे संवर्धन व्हावे, नद्यांना मूळ स्वरूप प्राप्त व्हावे, यासाठी विविध ठिकाणी नदी समन्वयक म्हणून काम करणारे नदी प्रेमी लोकसहभागातून विविध प्रकारे लोकप्रबोधन करत आहेत.
सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातून १६५ वाहणाऱ्या माणगंगा नदीवर गेल्या दहा वर्षापासून विविध उपाय योजना, लोकप्रबोधन व नदीकाठच्या गावातून जनजागृती सुरू आहे. माणगंगा भ्रमणसेवा बहुउद्देशीय संस्था ही गेले अनेक वर्षापासून लोक सहभागातून माणगंगा नदीचे पावित्र्य वाढविण्याचे काम करत आहे. तर सन २०२२ पासून महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार – २ या योजनेअंतर्गत ही संस्था काम करत असून नदीकठच्या प्रत्येक गावात जाऊन नदी स्वच्छतेबद्दल प्रबोधन करत आहे. गावोगावच्या नागरिकांना एकत्र करून नदी स्वच्छतेविषयी कार्यशाळा घेण्यात आल्या.
तसेच नदीपात्रात केले जाणारे रक्षाविसर्जन नदीपात्रात न करता शेताच्या बांधावर रक्षाविसर्जन करावे व त्यावर वृक्षारोपण करून वृक्ष पूजा करावी.असे नदीकाठच्या स्मशानभूमीवर बोर्ड लावून ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली जात आहे. तसेच माण नदीवर बांधलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूला सूचनाफलक लावून नदीपात्रात कसलीही घाण टाकू नये. याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी असे माणगंगा समन्वयक व माण नदी केंद्रस्थान अधिकारी (नोडल ऑफिसर) यांचे कडून कळविण्यात येत आहे.