फॅबटेक इंजिनिअरिंगला ‘नॅक’ चे ‘ए’ मानांकन; गुणवत्तेची परंपरा कायम राखल्याचा मान: श्री भाऊसाहेब रुपनर

सांगोला :येथील फॅबटेक एज्युकेशन सोसायटी संचलित फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ला देशातील शैक्षणिक क्षेत्रात महत्वपूर्ण असलेले ‘नॅक’ अर्थात ‘नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रिडिटेशन कौन्सिल’ चे ‘ए ‘ हे मानांकन मिळाले आहे., अशी माहिती इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. रविंद्र शेंडगे यांनी दिली.
‘नॅक’च्या प्रक्रियेचा भाग म्हणून महाविद्यालयाने पूर्वी एसएसआर (सेल्फ स्टडी रिपोर्ट) ‘नॅक’ कडे जमा केलेला होता. त्यानंतर महाविद्यालयाने पुरवलेल्या माहितीची पडताळणी झाल्यानंतर दि. ११ व १२ मार्च २०२४ या दोन दिवशी ‘नॅक’च्या त्रिसदस्यीय समितीने महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन महाविद्यालयातील सर्व भौतिक सुविधा, अध्ययन-अध्यापन पद्धती, विद्यार्थी पूरक सुविधा, महाविद्यालयाची शैक्षणिक उद्दीष्टे, अभ्यासक्रमाचा दर्जा व त्याची अंमलबजावणी, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शिक्षकांची गुणवत्ता, शैक्षणिक व पायाभूत सुविधा, कॅम्पस प्लेसमेंट, संशोधन तसेच यापूर्वी मिळालेल्या मानांकनापासून ते आतापर्यंत महाविद्यालयाने केलेली प्रगती व इतर महत्वपूर्ण बाबींची शहानिशा करून आपला अहवाल ‘नॅक’ कडे सादर केलेला होता.
‘नॅक’ चे हे मानांकन मिळाल्यामुळे फॅबटेकच्या शिक्षणाच्या दर्जावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. ‘नॅक’ ही शैक्षणिक संस्थांना मानांकन देणारी देशातील स्वायत्त संस्था असून ‘नॅक’चे मानांकन असणाऱ्या शिक्षण संस्थांना एक वेगळी ओळख प्राप्त होत असते. या मानांकनामुळे विद्यार्थी, पालक, नोकऱ्या देणाऱ्या कंपन्या व इतर समाज घटकांना येथील शिक्षणाच्या उच्च दर्जाबाबत खात्री मिळत असते. या मानांकनामुळे महाविद्यालयाला एक उच्च दर्जाचे गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाल्याने, महाविद्यालयास विविध संस्थाकडून अधिक संशोधन निधी मिळण्यास मदत होईल.
या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन मा.श्री.भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर मा.डॉ.अमित रुपनर कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे, संचालक डॉ .डी. एस. बाडकर यांनी या मानांकनाबद्दल प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले.
* ग्रामीण भागातील फॅबटेक महाविद्यालयाने गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. यापुढील काळात संस्थेच्या सर्वच महाविद्यालयांचे मानांकन उंचाविण्यासाठी गुणवत्ता वाढीवर अधिक भर दिला जाईल. *
– मा. श्री भाऊसाहेब रुपनर , चेअरमन
* ‘नॅक‘चे ‘ए‘ मानांकन हे महाविद्यालयाच्या उज्ज्वल परंपरेला साजेसे आहे. मानांकनासाठी महाविद्यालयातील सर्व घटकांनी विशेष मेहनत घेतली.त्याचे हे फळ आहे. यापुढील काळात महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जा कायम राखण्यास कायम कटिबद्ध आहे.*
– डॉ. अमित रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर