सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

*अहो साहेब… या रस्त्यावर मत मागायला कसे येणार ओ..!*

 

नाझरा(सुनील जवंजाळ):- सध्या संपूर्ण देशात लोकशाहीचा उत्सव साजरा होणार असल्याची चाहूल सुरू झाली आहे.लोकसभा निवडणुकीच्या घोषणा झालेल्या आहेत.लवकरच सर्व पक्षांचे उमेदवार ही जाहीर होतील तर काही पक्षांचे उमेदवार जाहीर झाले आहेत.सध्या ज्यांची उमेदवारी घोषित झाली आहे असे उमेदवार,त्यांचे कार्यकर्ते तालुक्यातील विविध ठिकाणी जाऊन मतांची मोर्चे बांधणी करत आहे,अशा सगळ्या वातावरणात गेल्या दीड ते दोन वर्षापासून चोपडी- नाझरा या रस्त्याचे रखडलेले काम अधिकच गंभीर स्थितीत रखडले आहे. सध्या गावातील मुख्य चौकात मोठी खडी टाकली असून छोट्या वाहनांना जाण्यासाठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा सगळ्या अडचणींमध्ये पुढच्या काळात विविध पक्षांचे “साहेब” मत मागण्यासाठी येणार आहेत.. “साहेब” अशा रस्त्यावरून मत मागायला तुम्ही कसे येणार?अशा प्रकारचा प्रश्न जनसामान्यांच्या माध्यमातून विचारला जात आहे.

 

गेल्या दीड ते दोन वर्षापासून चोपडी ते नाझरा रस्ताचे काम या ना त्या कारणाने रखडत गेले आहे.चोपडी पासून बनसोडेवाडी पर्यंत रस्त्याचे कच्चे काम पूर्ण झाले आहे परंतु गेल्या सहा महिन्यापासून रस्ता पक्का होण्याची वाट येथील वाहनधारक करत आहेत.या रस्त्यावरून जाणाऱ्या असंख्य वाहनधारकांना रस्त्यावर असणाऱ्या छोट्या-मोठ्या खडींचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरून असंख्य सायकल धारक विद्यार्थी शाळेच्या निमित्ताने नाझराकडे जातात त्याचबरोबर अनेक प्रकारची वाहने सतत या रस्त्यावरती ये-जा करत आहेत. चोपडीकडे येणारा कोणताही रस्ता सुस्थितीत नसल्याने पाहुण्यांना चोपडीकडे यायचे म्हटले की अंगावरती काटा येतो.चोपडी ते चिंद्यापीर रस्ता प्रचंड दुरावस्थेत आहे.

 

या रस्त्यावर काही ठिकाणी दोन-तीन फूट खड्डे आहेत,चोपडी ते माऊली गुळ फॅक्टरी पर्यंतचा रस्ता प्रचंड दुरावस्थेत आहे, उदनवाडी कडून चोपडीकडे येताना अनेक ठिकाणी रस्ता दुरावस्थेत आहे.एकंदरीतच चोपडीकडे येणारा प्रत्येक रस्ता अडचणीचा ठरत असल्याने चोपडीकरांना यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून विविध पक्षांचे पदाधिकारी,उमेदवार मत मागण्यासाठी चोपडी गावाला येणार आहे.तेव्हा चोपडीकरांची माफक भूमिका आहे की मत मागायला येताना “साहेब” किमान तुम्हाला तरी त्रास व्हायला नको. सध्या चोपडी गावामध्ये संत तुकाराम महाराज यांचा बीजउत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे.

 

दररोज महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन चोपडीतील हे चौकात होत आहेत. या कीर्तनासाठी असंख्य भाविक उपस्थित असतात या सगळ्या भाविकांना अर्ध्या अवस्थेत असणाऱ्या रस्त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.शेवटी सामान्य चोपडीकरांची एकच भूमिका असणार आहे ती म्हणजे कच्चा असणारा हा रस्ता पक्का करावा अन्यथा प्रकारच्या आंदोलनासाठी चोपडीकर नेहमीच तयार असतात. चोपडीतील सामान्य नागरिकांच्या समस्यांच्या उत्तरापर्यंत आपल्या साहेबांनी पोहोचावं एवढीच अपेक्षा… पाहूया “साहेब” कधी पावतात ते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!