सांगोला तालुका

इनरव्हील क्लब ऑफ सांगोला यांचा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न

सांगोला ( वार्ताहर ) :- इनरव्हील क्लब ऑफ सांगोला यांचा 2023 -24 चा पदग्रहण समारंभ दि. 9 जुलै 2023 रोजी कविराज मंगल कार्यालय येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून पंढरपूरच्या सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. वर्षाताई काणे लाभल्या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात सौ मंगल चौगुले व सौ वर्षा देशपांडे यांच्या गणेश वंदनाने झाली. दीप प्रज्वलनानंतर मागील वर्षाच्या अध्यक्षा सौ उमाताई उंटवाले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते व्यक्त करताना त्यांनी आपल्या टीमचे सर्व पदाधिकारी यांचा मेडल देऊन सन्मान केला. तसेच “बेस्ट इनरव्हील मेंबर “ही ट्रॉफी सौ वर्षा बलाक्षे यांना देण्यात आली . 2022-23 या वर्षात ट्रेझर म्हणून वर्षाताईंनी काम पाहिले होते .

तसेच वेळोवेळी उमाताईंना मदत करणाऱ्या सुवर्णा इंगोले मॅडम यांनाही ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
आपल्या मनोगतात मा. अध्यक्ष म्हणाल्या की इनरव्हील ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची दोन नंबरची स्त्रियांची संघटना आहे.

या संघटनेत सांगोला क्लब ची अध्यक्ष होण्याचा आनंद मी वर्षभर लुटला. घरच्या, तसेच समाजातील अनेक घटकांच्या सहकार्याने मी हे काम करू शकले याचा मला आनंद आहे.
सर्व पदाधिकाऱ्यांनी मागील वर्षाचे अहवाल वाचन केले.
डॉ. वर्षाताई काणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदग्रहण समारंभ पार पडला. नवीन अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना सौ. सविता ताई लाटणे म्हणाल्या की मी माझे काम माझ्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने नेटाने व आनंदाने करेन. बाजीप्रभूं सारखी मी खिंड लढवायला तयार आहे. पण मला त्यासाठी सर्व मावळ्यांची साथ हवी आहे. सर्व मेंबर्सनी मला सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केले. त्यानंतर नवीन एडिटर सौ संगीता चौगुले यांनी तयार केलेल्या क्लबच्या ‘ स्फूर्ती ‘ या बुलेटीनचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

आपल्या मार्गदर्शनात डॉ. वर्षाताई काने यांनी अत्यंत मौलिक विचार मांडले सामाजिक बांधिलकी म्हणून इनरव्हील चे काम मनापासून व आनंदाने करा , पण ते करत असताना आपण संसार व स्वतःकडेही योग्य लक्ष दिले पाहिजे. प्रत्येकीने दररोज पाऊण तास तरी चालण्याचा सोपा व्यायाम केलाच पाहिजे असे आवर्जून त्यांनी सांगितले. आपल्या सुरेल शब्दांनी, सुमधुरवाणीने त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमात सौ मंगल चौगुले यांनी एका मुलीस शैक्षणिक साहित्य देऊन पहिला उपक्रम पार पाडला. यानंतर रोटरी क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष मा. प्रा.श्री साजिकराव पाटील सर व सचिव ॲड‌. श्री सचिन पाटकुलकर यांनी नवीन अध्यक्षांचा सत्कार केला. रोटरीचे अनेक सदस्य या कार्यक्रमास उपस्थित होते. सविता ताईंचे बंधू श्री मुकुंद रसाळ व त्यांचे कुटुंबीय आणि इतर पाहुण्यांनी सत्कार केला. सौ कविता कांबळे, सौ वर्षा दौंडे, सौ शारदा जाधव, डॉक्टर सौ सुपर्णाताई केळकर, सौ विद्या बनकर, सौ राधा चांडोले या सदस्यांनी नवीन पदार्पण केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख माधुरीताई गुळमिरे यांनी करून दिली. पाहुण्यांबद्दल आपुलकीचे मनोगत नवीन सेक्रेटरी सौ अश्विनी कांबळे यांनी केले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सुवर्णा इंगोले मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन उपाध्यक्षा स्वाती अंकलगी यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली व नंतर सर्वांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!