*यशस्वी विद्यार्थी हा विद्यामंदिरचा खरा ब्रँड- प्रा.प्रबुद्धचंद्र झपके*
सांगोला (वार्ताहर) विद्यामंदिरचे विविध क्षेत्रातील यशस्वी विद्यार्थी हे येथे मिळालेल्या ज्ञानाचे व शिस्तीचे बाहेरील जगात खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व करतात हे विद्यार्थीच विद्यामंदिरचे खरे ब्रँड अँबेसिडर असून गुणवत्तेची परंपरा शाळेचे पहिले विद्यार्थी जेष्ठ साहित्यिक द.ता.भोसले यांच्यापासून आजतागायत अबाधित असून प्रतिवर्षी गुणवत्तेत वृद्धीच अपेक्षित आहे असे विचार संस्थाअध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी मंथन परीक्षेत राज्यस्तरावर गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात व्यक्त केले.यावेळी व्यासपीठावर प्राचार्य गंगाधर घोंगडे, अमोल गायकवाड, श्रीकांत लांडगे, मुख्याध्यापक उदय बोत्रे, सरिता लिगाडे,रोहिणी व्हटे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, विभाग नियंत्रक व पर्यवेक्षक बिभीषण माने, पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार, रफिक मणेरी, संस्थाबाह्यपरीक्षा विभागप्रमुख नामदेव खंडागळे उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेत आज विद्यामंदिरचा ठसा उमटवताना विद्यार्थ्यांचे कष्ट, शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य व प्रशासनाचे नियोजन महत्त्वाचे असून आज विद्यार्थी पालक व शिक्षक यांच्या समन्वयातूनच हे दैदीप्यमान यश मिळत आहे असे प्रा.झपके म्हणाले.
याप्रसंगी विराज भाऊसो सूर्यवंशी, (इ.दुसरी, राज्यात पहिला), कु.ओवी अभिजीत तारळेकर,(इ.पाचवी राज्यात सातवी), कु.शुभ्रा अजित पाटील, (इ.पाचवी, राज्यात सातवी), सार्थक हरिश्चंद्र लवटे, (इ.पाचवी, राज्यात आठवा), यश हरिश्चंद्र सावंत, (इ.पाचवी, राज्यात नववा), अथर्व राहुल चंदनशिवे, (इ.सहावी, राज्यात नववा), दिग्विजय संभाजी पवार, (इ.आठवी, राज्यात चौथा) या यशस्वी विद्यार्थ्यांचा सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाकडून रोख पारितोषिके व बुके देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पालक व मार्गदर्शक शिक्षकांनाही सन्मानित करण्यात आले.
दिग्विजय पवार, ओवी तारळेकर व शुभ्रा पाटील या विद्यार्थ्यांनी नियोजनबद्ध अभ्यासातून शिक्षकांनी व शाळेने आम्हाला यशापर्यंत पोहोचवल्याची भावना व्यक्त केली. सौ.उषा पवार व श्री.अजित पाटील सर या पालकांनी आपल्या मनोगतातून आज सर्वत्र शैक्षणिक बाजारीकरणाची परिस्थिती असतानासुद्धा विद्यामंदिरने विद्यार्थ्यांना मोफत व दर्जेदार शिक्षण देत आपले वेगळेपण टिकवून ठेवले असून आमचे विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात याबद्दल आम्ही पालक म्हणून सदैव समाधानी व शाळेबद्दल ऋणी राहणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रम प्रसंगी संस्थापक अध्यक्ष कै. गुरुवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास पालकांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार समर्पित करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग नियंत्रक बिभीषण माने, सूत्रसंचालन प्रशाला बाह्यपरीक्षा विभागप्रमुख वैभव कोठावळे यांनी तर आभार प्रदीप धुकटे यांनी मानले.
कार्यक्रमानंतर विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठी अल्पोपहार व चहापान करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
*राज्यभरातून मंथन परीक्षेसाठी यावर्षी एकूण 4 लाख 80 हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यामधून सांगोला विद्यामंदिर प्रशाला व सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय या शाळेतील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर मिळवलेल्या यशाबद्दल सांगोला व परिसरातील नागरिकांतून या विद्यार्थ्यांचे व शाळेचे कौतुक होत आहे.*