कोळा परिसरात पिण्याची पाण्याची टंचाई, चाऱ्याचाही प्रश्न गंभीर…
जुनोनी तिप्पेहळी किडबिसरी परिसरातील चित्र.. कडब्याचे भाव कडाडले..

सांगोला तालुक्याच्या पश्चिम भागातील कोळा परिसरातील हतीद तिप्पेहळी किडबिसरी जुजारपूर हटकर मंगेवाडी गुणापवाडी गौडवाडी आदी गावांत पावसाने हुलकावणी दिल्याने खरिपातील ज्वारीची पेरणी कमी झाल्याने त्याचा फटका पशुपालकांना बसत आहे. त्यातच पाणी टंचाईच्या झळा वाढल्या असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. कोळा भागात टेंभूचे पाणी बंद झाल्यामुळे गावठाणात पाणीटंचाई भासत आहे नळाला ६ दिवस पाणी येत नसल्याने हाल सुरू शेतीला पाणी नसल्याने पिके जळू लागले आहेत. अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
शासनाने उपाययोजना करून विहीर अधिग्रहण करून पिण्याची पाणी टंचाई दूर करावी अशी मागणी होत आहे. सध्या कडब्याचे दर तेजीत आहेत. उन्हाळी चारापिके घेण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्यामुळे कडब्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. मागील वर्षी पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील ज्वारीची पेरणी अत्यल्प झाली होती. पेरणी कमी झाल्याने चारा टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांच्या वार्षिक चाऱ्याचे नियोजन शेतकरी उन्हाळ्यात करतात. मार्च ते मे दरम्यान चारा खरेदी करून साठवला जातो. सध्या गावोगावी ज्यांच्याकडे थोडाफार कडबा आहे, त्यांचे गंजी उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र, महागडा चारा खरेदी करणे शेतकऱ्यांना कठीण आहे. कडब्याचे दर प्रतिशेकडा दोन ते अडीच ते तीन हजार रुपयांवर पोहोचले आहेत. दूध व्यावसायिकांना या दरवाढीचा फटका बसला आहे. दुभत्या जनावरांसाठी कडबा आवश्यक आहे.
वाढत्या दरामुळे चारा खरेदी करणे परवडणारे नाही. पौष्टिक खाद्य म्हणून कडब्याला पसंती असते. मात्र, त्याचे दर अधिक वाढल्यास खरेदीवर परिणाम होणार आहे. यंदा एप्रिलमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली. पावसाचे प्रमाण कमी असल्याने विहिरी, कूपनलिकांमध्येही पाणीसाठा अत्यल्प राहिला. लहान-मोठे बंधारे कोरडे पडले. विहिरींनी तळ गाठल्याने केवळ पंधरा ते वीस मिनिटे कृषिपंप चालत आहे. त्यामुळे नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. मका, हत्तीघास यांसारखी चारापिके पाण्याअभावी करपू लागली आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत जनावरे जगवायची तरी कशी, असा प्रश्न पशुपालक शेतकऱ्यांना पडला आहे.चाऱ्याचा प्रश्न गंभीर दुभत्या जनावरांना खाद्यासह सुका व ओला चारा गरजेचा असतो. मात्र, यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे चाऱ्याचा गंभीर प्रश्न पशुपालक शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा राहिला आहे. पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांना ओला चारा मिळणे कठीण झाले आहे. त्यातच चाऱ्याचेही दर वाढले आहेत. त्यामुळे जनावरे जगवायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे..
कोळा भागात टेंभूचे पाणी बंद झाल्यामुळे गावठाणात पाणीटंचाई भासत आहे नळाला ६ दिवस पाणी येत नसल्याने हाल सुरू शेतीला पाणी नसल्याने पिके जळू लागले आहेत. अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने उपाययोजना करून विहीर अधिग्रहण करून पिण्याची पाणी टंचाई दूर करावी अशी मागणी आहे.
~ भिमराव माने ,ग्रामस्थ कोळा
~
कोळा भागात विहिरी आटले असल्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे जीवन प्राधिकरण शिरभावी पाणीपुरवठा योजनेचे पाणी कधी होणार याकडे लक्ष लागून आहे संबंधित प्रशासनाकडे ग्रामपंचायतने विहीर अधिग्रहण व पाण्याचा टँकर मिळण्याबाबत प्रस्ताव पाठवला आहे प्रशासनाने मंजूर करावा अशी मागणी आहे..