उत्कर्ष मातृप्रबोधन मंच चा वसंतोत्सव आणि चैत्रागौरी चा कार्यक्रम उत्साहात संपन्न*

नुकताच उत्कर्ष मातृप्रबोधन मंचचा वसंतोत्सव आणि चैत्रागौरी हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला.या कार्यक्रमासाठी, मोठा व्यासंग असलेल्या तसेच सायकॉलॉजी तज्ञ, अध्यात्मिक अभ्यास असलेल्या आणि दासबोध वर्ग घेत असणारे असे महान व्यक्तिमत्व डॉ.गिरिषा ताई सेवक प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. त्यांच्या सोबतीला त्यांची सखी संध्याताई काणेगावकर यादेखील उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते चैत्रागौरी पूजन करण्यात आले.यानंतर शुभांगी ताईंनी म्हटलेल्या वसंतोत्सव गीताने वातावरण एकदम प्रफुल्लित झाले. सौ.निलीमा ताईंनी पाहुण्यांचे स्वागत पुष्प देऊन केले.सौ.उमा जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सन्माननीय पाहुण्यांची ओळख करुन दिली.
गिरिषा ताईंनी व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी ओंकार ध्वनीची निर्मिती पोट, घसा आणि नाक यांच्यातून कशी होते याचे प्रात्यक्षिक तीन स्टेप्स मध्ये दाखवून ते जमलेल्या श्रोत्यांकडून करून घेतले.
आपल्या व्याख्यानात, ‘जे जे माझे आहे ते मी नाही.’ ह्या मंत्राचा जप दहा दिवस करून प्रत्येक गोष्टीला आसक्तीचा मोह सोडून आत्मानंद कसा मिळवता येतो, याचे विवेचन त्यांनी केले.
दासबोधातील श्लोक उदाहरण देत, *प्रपंच आणि परमार्थ* कार्यक्रमाच्या या मुख्य विषयाला त्यांनी हात घातला. आधी प्रपंच नीटनेटका करावा आणि मगच परमार्थ साधावा.प्रपंचात राहूनही जर परमार्थ करायचा असेल तर ब्रम्ह मुहूर्तांची वेळ योग्य आहे. प्रपंच सोडून परमार्थ करू नये. प्रपंच सावधपणे व प्रामाणिकपणे करावा म्हणजे न्याय,नीती ,धर्म या गोष्टींचा पाठपुरावा करावा. प्रपंच प्रामाणिकपणे केला तरच परमार्थ देखील प्रामाणिक होतो. आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातील निरनिराळी उदाहरणे देत जमलेल्या सख्यांना हे पटवून सांगितले.
यानंतर माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संस्थेतर्फे प्रत्येक विभागातून उत्तम कामगिरीबद्दल पाहुण्यांच्या हस्ते, प्रमाणपत्र ट्रॉफी आणि पुस्तक असे पारितोषिक देऊन त्यांच्या गौरव करण्यात आला.
विभाग आणि त्यांची नावे पुढीलप्रमाणे:- संस्था विभागासाठी मंगल कुलकर्णी पारितोषिकासाठी मानकरी ठरल्या. तसेच पूर्व माध्यमिक विभागात शालन गयाळी व प्राथमिक विभागातून माधवी केदार तर माध्यमिक विभागासाठी सचिन गोतसूर्य असा या सर्व गुणी शिक्षकांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
तसेच गुणवंत सेविका म्हणून सुनिता जाधव यांचा तर कार्यालयीन कर्मचारी अविनाश पोफळे यांचाही पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
मातृप्रबोधन मंचच्या गेल्या महिन्यातील कार्यक्रमात चर्चासत्रात उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला म्हणून त्यांना पारितोषिक देण्यात आली त्यांची नावं पुढीलप्रमाणे..1. विद्या माळी 2. अश्विनी नलवडे3. अफसाना पठाण4. शैला मोरे5. सुवर्णा जांगळे6. सुवर्णा सपताळ7. माधवी केदार.
चैत्रागौरी निमित्ताने जमलेल्या महिलांना हळदीकुंकू देऊन डाळ आणि पन्हे देऊन उत्सव साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्षा डॉ. संजीवनी केळकर, उपाध्यक्ष सौ. माधवीताई देशपांडे, पदाधिकारी सौ .नीलिमा कुलकर्णी ,सौ. वसुंधरा कुलकर्णी, आणि सौ .शालिनी कुलकर्णी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सुप्रिया कांबळे यांनी केले.व आभार सौ पुष्पलता मिसाळ यांनी मानले.
ऑफिस मधील सर्व स्टाफ तसेच शाळेतील सर्व शिक्षक वर्ग आणि मातृ प्रबोधन मंच सदस्य या सर्वांनी मिळून कार्यक्रमाचे नियोजन चोखपणे बजावून कार्यक्रम उत्साहात पार पाडला.